अध्याय अकरावा
भगवंत म्हणाले, माझी पूजा करत असताना कोणी संत घरी आल्यास त्यांची पूजा आधी करावी असे माझे म्हणणे आहे. मला निरिच्छाला सुद्धा संतांची इच्छा असतेच. माझे पूजाध्यान सोडून जो संतांना लोटांगण घालतो, त्याने कोटियज्ञांचे फळ मला अर्पण केले म्हणून समजावे. संतांची पूजा करणाऱयानेच सर्व तीर्थात स्नान केले व त्यानेच जपतपांची फळे मिळवली असे समजावे. माझ्या प्रतिमा असतात त्या अचेतन मूर्ति असतात पण संत ह्या माझ्या सचेतन (चालत्या बोलत्या) मूर्ति आहेत. पूर्ण श्रद्धा धरून त्यांची भक्ति केली असता, ती नक्की मला पावते. ज्याप्रमाणे स्त्रिया, पूत्र व संपत्ती पाहुन डोळय़ांना सुख वाटते, त्याप्रमाणेच माझा भक्त आवडीने संतप्रतिमांचे दर्शन घेतो. त्यानेच नेत्रांचे सार्थक होते असे समज. अशा रीतीने नेत्रांकडून भजन घडते. संत हे माझ्याच मूर्ति आहेत अशा कल्पनेने त्यांच्याकडे पाहून तो मोठय़ा उत्कंठेने धावत जाऊन आवडीने त्यांना आलिंगन देतो. त्या योगाने सर्व अंगच पावन होते. पायांचा उपयोग तीर्थयात्रा करण्यासाठी, संतांच्या जवळ जाण्यासाठी किंवा श्रीहरीच्या सभामंडपात नाचण्यासाठी जे करत नाहीत त्यांना पाय असून नसल्यासारखेच होत. लोक अनेक प्रकारच्या विषयसुखांसाठी नीचापुढे लाळ घोटायला लाजत नाहीत पण श्रीहरीच्या सभामंडपात नाच म्हटले की त्यांच्या जीवावर येतं. तीर्थयात्रेला जातांना, पुण्यक्षेत्राला गमन करिताना, हरिकीर्तनाच्या जागरणाला जाताना, संतांच्या बरोबर चालताना किंवा श्रीहरीच्या रंगमंडपात नृत्य करीत असताना पायांना जे श्रम होतात, त्यानंच पाय सार्थकी लागतात. इतर ठिकाणी जाणे म्हणजे अधःपाताकडे जाणे होय.
सर्वतोपरी निष्कपटपणा ठेवून कवडीपासून कोटय़वधीपर्यंत असलेले संपूर्ण द्रव्य ज्याने मला अर्पण केले, त्यालाच माझे ‘अर्चन’ असे म्हणतात.
धनधान्य गुप्तपणे संग्रहाला ठेवून केवळ वर वर माझी पूजा करावयाची, तो काही अर्चनाचा प्रकार नव्हे. तो माझ्याशी कपटाने वागणारा होय, हे लक्षात ठेव.
आपल्याला खावयाला मिळावे ह्या आशेने जो देवमूर्तीपुढे पक्वान्ने ठेवतो आणि अतिथि आल्यास त्याला अन्नसुद्धा घालीत नाही, ते काही माझे अर्चन नव्हे. पूजा करून पवित्र झालेले हात भगवंताला आवडतात. जे भगवंताची पूजा करीत नाहीत, ते हात प्रेताचेच होत असे समज. हातांनी ईश्वरमूर्तीची पूजने न करता व सत्पात्री दाने न देता, हातांमध्ये रत्नजडित अंगठय़ा व पोच्या घातल्या, तर ते प्रेताला दागिने घालण्याप्रमाणेच आहे. हरिकीर्तन केल्याने किंवा अखंड नामस्मरणानेच वाणीचे सार्थक होते. ‘जयजयकारा’ च्या गर्जनेनेच त्रिभुवने पावन केली आहेत. ज्याची वाणी रामनामाच्या गर्जनेने सदासर्वदा गरजत असते, तेथे कळीकाळालासुद्धा थारा उरत नाही. पातके तर लांब पळून जातात. करंटी माणसे हरीचे नाम सोडून देऊन वायफळ चकाटय़ा पिटतात. ज्याप्रमाणे हगवणीची पिरपिर असते, तशाच गोष्टी ते बडबडतात असे समजावे. हरिनामाच्या उच्चाराने होणारा सुखाचा आनंद ज्याच्या मुखाला गोड लागला, त्याचे तोंड नेहमी माझ्याकडेच वळलेले असते आणि मी नेहमी त्याच्यापाशी असतो.
आता नमस्काराचे म्हणजे नमनाचे निरूपण ऐक. माझ्या प्रतिमेचे दर्शन घेऊन किंवा संतजनांना पाहून देहाभिमान सोडून जो भक्तिभावाने लोटांगण घालतो, साधुजनांना नमस्कार करताना मनाला तृप्ती झाली असे मानत नाही, विनयाने अत्यंत नम्र होऊन पुनःपुन्हा चरणांवर मस्तक ठेवतो, तेच ‘नमन’ होय. भगवद्?भक्तांच्या पायांची धूळ जो आपण होऊन शिरसावंद्य करीत नाही, तो जिवंत असला तरी प्रेतासमानच समजावा.
प्रेताप्रमाणेच अमंगळपणा त्याच्या ठिकाणी असतो. लौकिकाच्या लज्जा सोडून देऊन जो आवडीने वैष्णवांच्या चरणधूलीत गडबडा लोळतो, तोच माझ्या भक्तीचा विकास होय. अशा आवडीने नमन केले असता मानाभिमान सहज निघून जातात. भक्तीचे हेच मुख्य लक्षण आहे की, मानाभिमान सोडून द्यावे.
क्रमशः







