व्हिजन हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ. शेटये यांचे प्रतिपादन : बोरी येथे शिर्डी संस्थानचे माजी ट्रस्टी गोपिनाथ कोते पाटील यांचा सत्कार
प्रतिनिधी /कुंभारजुवे
साईबाबांच्या शिकवणीचे कार्य गोव्यात सर्वत्र चालू आहे. बोरी गावचे साईभक्त सगुण मेरु नाईक हे बाबांची सेवा करण्यासाठी शिर्डीला होते. साईबाबांच्या पूनीत सहवासाने पावन झालेल्या बयाजी कोते पाटील यांचे सुपूत्र साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी ट्रस्टी गोपिनाथ (अण्णा) कोते पाटील यांचा सत्कार करण्याचे भाग्य आपणाला इथे साईमंदिरात लाभले हा आपला आनंदाचा क्षण आहे. सध्या लोकांचा कल अध्यात्माकडे जास्त झुकल्याने मानसिक शांतीसाठी ते लाभदायक आहे, असे उद्गार व्हिजन हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ. चंद्रकांत शेटये यांनी काढले.
बोरी येथे पर्वरी येथील अनिल शिवराम नाईक कुटुंबातर्फे साजरा केलेल्या श्रावणी गुरुवारनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्य़ाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंदकांत शेटये बोलत होते. यावेळी शिर्डी साईबाब संस्थानचे माजी ट्रस्टी गोपिनाथ (अण्णा) कोते पाटील, अखिल गोमंतक साई सेवा मंडळ गोवाचे अध्यक्ष वज्रधर कळंगुटकर, सौ. व श्री. अनिल नाईक, साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नारायण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे अनिल नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. चंद्रकांत शेटये यांनी गोपिनाथ कोते पाटील यांचा सत्कार केला.
आपण देश विदेशात पुष्कळ ठिकाणी साई कार्यक्रमांनिमित्त फिरलो परंतु गोव्यासारखी साईभक्ती कुठेच अनुभवली नाही. गोव्यात एवढय़ा मोठय़ा संख्येने साईंची मंदिरे आहेत हे सुद्धा साईभक्तीचे ज्वलंत उदाहरण आहे. इथले साईभक्त सगुण मेरु नाईक शिर्डीमध्ये हॉटेल चालवित होते. माझ्या लहानपणी त्यांना बघितले असून त्यांच्या हॉटेलवर चहाही घेतलेला आहे. त्यांच्याच गावांतल्या साई मंदिरात आपला सत्कार होतोय हे आपले भाग्य समजतो, असे गोपिनाथ कोते पाटील म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईसेवक रामानंद तारी यांनी केले तर आभार मंदिराचे अध्यक्ष नारायण नाईक यांनी मानले.









