साटेली /वार्ताहर-
दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी सावंतवाडी तालुक्यातील साटेली गावात कुत्र्याची शिकार करण्याच्या उद्देशाने मानवी वस्तीत शिरलेल्या व गोडावूनमध्ये अडकलेल्या बिबट्याची सावंतवाडी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या बचाव पथकाने सुखरूप सुटका केली.

आज दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री दोनच्या सुमारास साटेली गावचे पोलीस पाटील विलास साटेलकर यांचे कडून वनविभागास मिळालेल्या खबरीनुसार मौजे साटेली येथील रहिवासी राजेंद्र उत्तम टेमकर यांचे गोडाउन मध्ये बिबट्या अडकले असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच सावंतवाडी वन विभागाची बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. यानंतर जागेवरील परिस्थिती पाहता राजेंद्र उत्तम टेमकर यांचे घरी जिन्यावर बांधले असलेल्या कुत्र्याची शिकार करण्याच्या उद्देशाने बिबट्या त्यांचे घराच्या आवारात शिरला होता. त्यानंतर त्याने कुत्र्याची शिकार करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला केला, परंतु बाहेर सुरू असलेल्या कुत्र्यांच्या गोंधळाने घरातील लोक जागे झाले व त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता बिबट्याने त्यांना घाबरून पळून जाण्याच्या उद्देशाने जिन्याच्या शेजारीच खाली असलेल्या गोडाऊनवर उडी मारली. परंतु गोडाऊन वर असलेल्या सिमेंटच्या पत्र्यामुळे बिबट्या पत्रा तोडून खाली गोडाउन मध्ये पडला. यानंतर घर मालक राजेंद्र उत्तम टेमकर यांनी जेव्हा गोडाऊनच्या सिमेंटच्या पत्र्याच्या तुटलेल्या भागातून आत बॅटरी च्या साह्याने पाहिले असता त्यांना एक बिबट्या तिथे असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ पोलीस पाटील साटेली विलास साटेलकर यांच्याशी संपर्क साधून याची कल्पना वनविभागाला दिली. यानंतर सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांचे बचाव पथक तसेच कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकांनी पाहणी केल्यानंतर सदर बिबट्या पूर्ण वाढ झालेला मोठा नर बिबट्या असून, त्याचे अंदाजे वय आठ ते दहा वर्ष दरम्यान असल्याचे निदर्शनास आले. बचाव पथकाने सदर बिबट्याला पिंजऱ्यामध्ये घेण्यासाठी सर्व पूर्वतयारी करून घेतली. बघ्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी घटनास्थळी पोलीस पथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर सर्व तयारी पूर्ण केल्यानंतर, अथक परिश्रमाने गोडाउन मध्ये अडकलेल्या बिबट्याला गोडाऊन चे शटर वर उचलून पिंजर्यात यशस्वीरित्या कैद करण्यात आले.
या बचाव मोहिमेत सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक मा. श्री. शहाजी नारनवर यांचे मार्गदर्शनाखाली RFO सावंतवाडी मदन क्षीरसागर, RFO कुडाळ अमृत शिंदे, वनपाल मळगाव प्रमोद राणे, वनपाल कुडाळ धुळा कोळेकर, वनरक्षक आप्पासाहेब राठोड, रमेश पाटील, सागर भोजने, वनमजूर पडते यांनी सहभाग घेतला. सदर मोहिमेमध्ये घरमालक, पोलीसपाटील तसेच सर्व साटेली ग्रामस्थांची मोलाचे सहकार्य लाभले.









