लहानग्या दुर्गप्रेमीचं आदित्य ठाकरेंना पत्र
ऑनलाईन टीम / नवी मुंबई
छत्रपती श्री. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड आणि कार्ला येथील एकविरा मंदिराला रोप वे बांधण्याचा निर्णय राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या निर्णयावरुन राज्यातील दुर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हा निर्णय घेत राजगडचा सिंहगड करु नका अशी ही अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा पुन्हा विचार व्हावा असे आवाहनही दुर्गप्रेमींनी केले आहे.
या प्रकल्पाबद्दल इतिहासप्रेमी, दुर्गमंडळे, संस्था तसेच गिर्यारोहकांची नाराजी असतानाच यातच एका लहानग्या दुर्गप्रेमीने ही राज्याच्या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तर, हा रोप वे न बांधण्याची केवीलवाणी विनंती ही केली आहे. गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ असे या लहानग्या दुर्गप्रेमीचं नाव आहे. तिचे हे पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
या पत्रात गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा हिने असे म्हटले आहे की, मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर आहे. माननीय आदित्य दादा आपण रोप वे बांधू नका. कारण गडावर आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरे असतात. आपण गर्दी केली हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घराबाहेर काढू नका कृपया मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना पाहायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू द्या अशी विनंती केली आहे.