जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचा इशारा
कोल्हापूर प्रतिनिधी
बजेट नाही म्हणून मानधन नाही अशी परिस्थिती केल्यास अंगणवाडी सेविका, मदतनीस नाईलाजाने मंत्र्यांच्या दारात धरणे आंदोलनासाठी बसतील, असा इशारा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे आणि सचिव सुवर्णा तळेकर यांनी एका पत्रकाव्दारे दिला आहे.
महागाईने महिला बेहाल झाल्या असताना सरकार एकात्मिक बाल विकास मानधन वेळेत देणार नसेल तर ते योग्य नाही, असेही पत्रकात म्हटले आहे. 2009 मध्ये मानधन थकल्यानंतर कोल्हापूर जिल्हयात अंगणवाडी कर्मचाऱयांनी मोर्चा काढून जिल्हा परिषद बंद पाडली होती. त्यानंतर माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर, तत्कालिन आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थी केली. त्यावेळी बजेट नसले तरी मानधन रोखता कामा नये, असा निर्णय मंत्रालयातील चर्चेत झाला आणि थकलेले मानधन दिले गेले. आज इतक्या महागाईच्या काळात अधिकारी बजेटचे कारण सांगून जर मानधन तटविणार असतील तर नाईलाजाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मंत्र्यांच्या दारात धरणे आंदोलन करण्यासाठी बसावे लागेल, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.