वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारी समस्येमुळे 14 वी आयपीएल क्रिकेट स्पर्धा अर्धवट स्थितीत तहकूब करावी लागली. दरम्यान, पुरस्कर्ते व जाहिरातदारांना या स्पर्धेतील झालेल्या सामन्यांचेच केवळ मानधन देण्यात यावे, असे स्टार स्पोर्ट्सतर्फे सांगण्यात आले आहे.
स्टार स्पोर्ट्स या क्रीडा वाहिनीने 2018 ते 2022 दरम्यान आयपीएलचे टीव्ही प्रक्षेपणाचे सर्व हक्क 16,348 कोटी रूपये देवून खरेदी केले आहे. त्याचप्रमाणे स्टार स्पोर्ट्सच्या करारानुसार आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी 54.5 कोटी रूपये देण्याचा करार केला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत एकूण 60 सामने खेळविले जातात पण 2021 सालातील आयपीएल स्पर्धा कोरोना महामारीमुळे तहकूब करण्यापूर्वी या स्पर्धेतील 29 सामने खेळविले गेले आहेत. तहकूब करण्यात आलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा काही दिवसांनंतर खेळविण्याची योजना असून वाहिनीशी केलेला करार पुढे चालू ठेवण्याची मुभा पुरस्कर्ते, जाहिरातदारांना देण्यात आली आहे.
2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळविल्या गेलेल्या पहिल्या 26 सामन्यांत स्टार इंडिया नेटवर्कला 352 दशलक्ष रक्कम मिळाली तथापि 2020 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत स्टार इंडिया नेटवर्कला 349 दशलक्ष रक्कम मिळाली होती. बीएआरसी इंडियाच्या डाटानुसार ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.









