ऑनलाईन टीम / मुंबई :
मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होममध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तेथील 29 गतिमंद मुले कोरोनाबाधित आढळली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मानखुर्दच्या चिल्ड्रन्स होम परिसरात गतिमंद मुलांसाठी शेल्टर होम आहे. तिथे लहान मुलांपासून वृद्ध गतिमंद व्यक्तींनाही ठेवण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच तेथील व्यवस्थापनाने मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधून काही मुलांना खोकला असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सर्व मुलांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यामध्ये 84 मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची करोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी 29 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
या मुलांना बीकेसीतील कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. तर दोन मुलांना कर्करोग असल्याने त्यांच्यावर सायनच्या लोकमान टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.