सध्या प्रसार माध्यमांमधील ‘टीआरपी’ घोटाळा गाजत आहे, किंवा हेतुपुरस्सर गाजवला जात आहे. मुंबई पोलिसांकडून याची चौकशी केली जात आहे. काही प्रसार माध्यमे आपला टीआरपी, अर्थात आपली लोकप्रियता किंवा प्रेक्षकवर्ग वाढविण्यासाठी टीव्ही धारकांना पैसे देत आहेत, असा या घोटाळय़ातील मुख्य आरोप आहे. यात काही लोकप्रिय वृत्तवाहिन्यांसह ‘रिपब्लिक टीव्ही’ (हिंदी व इंग्रजी) या वाहिनीचाही समावेश करण्यात आला असून या वाहिनीच्या काही मुख्य पदाधिकाऱयांची चौकशीही मुंबई पोलिसांनी केली आहे. हा घोटाळा 40 हजार कोटी रूपये इतक्या प्रचंड रकमेचा असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनीच केल्याने या आरोपाचे विश्लेषण अहमअहमिकेने केले जाणे साहजिक आहे. सध्या जी काही थोडीफार क्षेत्रे आपली विश्वासार्हता निदान चांगल्यापैकी प्रमाणात टिकवून आहेत, त्यात वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांचा समावेश केला जातो. तथापि, सर्वच क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्ती असतात. त्यापासून प्रसार माध्यमे पूर्णतः अलिप्त असतील आणि त्यांचे व्यवहार शंभर टक्के प्रामाणिकपणे आणि नीतीमत्तेच्या चौकटीत राहून चालतात असे मानणे अतिशयोक्ती ठरेल. प्रसार माध्यमे हाही अलीकडच्या काळात पैशाचाच खेळ झाल्याने सन्माननीय अपवाद वगळता इतर क्षेत्रातील अपप्रवृत्ती याही व्यवसायात असणे नाकारता येणार नाही. प्रत्येक क्षेत्रातील भ्रष्टाचारी प्रवृत्तींकडून त्या त्या क्षेत्राला अनुसरून भ्रष्टाचाराचे नवे नवे मार्ग शोधून काढले जातात. माध्यम व्यवसायात ‘पेड न्यूज’ हा प्रकार कित्येक दशकांपासून प्रचलित असल्याचे बोलले जाते. त्यातच आता या टीआरपी घोटाळय़ाची भर पडली आहे, असे म्हणता येईल. मात्र विश्लेषण करीत असताना, एकंदर प्रकाराच्या सर्व बाजू समजून घ्याव्या लागतात आणि राजकीय तसेच इतर पार्श्वभूभीही तपासावी लागते. आरोपांची सत्यासत्यता पडताळण्याचा आणि त्याप्रमाणे आदेश देण्याचा अधिकार न्यायालयांचा असतो. त्या अधिकारला धक्का न लावता कोणत्याही संवेदनशील आरोपाचे विश्लेषण करावे लागते. भ्रष्टाचार सर्वच क्षेत्रांमध्ये आहे, मग प्रसार माध्यमे अपवाद कशी असतील असा प्रश्न विचारून कोणत्याच भ्रष्टाचाराचे अप्रत्यक्ष समर्थन करणे अशोभनीय असते. वृत्तपत्रे व प्रसार माध्यमे इतर क्षेत्रांमधील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवितात व जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. मग वृत्तव्यवसायाशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांचेही त्यांनीच परखड आणि पारदर्शी विश्लेषण करण्यास मागेपुढे पाहू नये, अशी लोकांची अपेक्षा असते व ती योग्यच म्हटली पाहिजे. सध्या गाजत असलेल्या टीआरपी घोटाळय़ावर विचार करण्यापूवीं प्रथम या घोटाळय़ाचे जे स्वरूप सांगितले जाते ते कसे आहे, हे पहावे लागणार आहे. आरोप असा काहे की काही टीव्ही वृत्तवाहिन्या टीव्ही धारकांना पैसे देऊन त्यांनी आपलीच वृत्तवाहिनी आपल्या टीव्ही संचावर अधिक प्रमाणात किंवा शक्य झाल्यास दिवसभर लावून ठेवावी, अशी तरतूद करतात. म्हणजेच ग्राहकांना आमिष दाखवून आपल्या वृत्तवाहिनीची लोकप्रियता वाढविणे असे या घोटाळय़ाचे सर्वसाधारण स्वरूप असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात. पहिलाच प्रश्न असा की प्रसार माध्यमांचा टीआरपी नेमका कसा मोजला जातो? अनेक वृत्त वाहिन्या आपण टीआरपीत प्रथम क्रमांकावर असल्याची जाहिरात नेहमी करत असतात. अशी जाहिरात कोणत्या आधारावर केली जाते? तसेच यालाच जोडून काही तज्ञांनी असाही प्रश्न उपस्थित केला आहे की प्रत्यक्ष टीव्ही धारकांनाच पैसे देऊन टीआरपी वाढविणे कोणत्याही वाहिनीला आर्थिकदृष्टय़ा शक्य होईय काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण टीआरपी हा हजार दोन हजार टीव्ही धारकांचा प्रश्न नसतो. लक्षावधी टीव्हीधारक ज्यावेळी एक विशिष्ट वृत्तवाहिनी आवर्जून दिवसाचा अधिकाधिक वेळ पाहतात तेव्हाच त्या वाहिनीचा टीआरपी लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे एक वाहिनी किती टीव्हीधारकांना किती काळ अशा प्रकारे पैशाच्या जोरावर आपल्याकडे आकर्षित करून ठेवू शकेल? एका टीव्ही धारकाला यासाठी किती पैसे दिले जाऊ शकतात? असे अनेक प्रश्न तज्ञांनी उपस्थित केले आहेत. कोणत्याही भाषेतील वृत्तवाहिन्या नियमितपणे पाहणाऱयांची एकंदर संख्या नेमकी किती आहे याही प्रश्नाचे नेमके उत्तर काढणे कठीण आहे. तथापि, एका अनुमानानुसार भारतात वृत्तवाहिन्या एकंदर टीव्ही पाहणाऱयांच्या संख्येच्या तुलनेने फारशा लोकप्रिय नाहीत. इंग्रजी-हिंदीसह सर्व भाषांच्या वृत्तवाहिन्या पाहणाऱयांची संख्या 6 ते 8 कोटींच्या वर नाही. त्यामुळे टीव्ही धारकांनाच पैसे चारून आपला टीआरपी वाढवायचा असेल तर कोटय़वधींना असे पैशाचे अमिष दाखवावे लागेल. ते वृत्तवाहिन्यांना शक्य आहे का हा प्रश्न आहे. शिवाय, केवळ पैसे मिळतात म्हणून टीव्ही धारकही आपल्या घरी किंवा मोबाईलवर एकच विशिष्ट वृत्तवाहिनी पाहील ही शक्यताही न पटण्यासारखी आहे. लोक टीव्ही घेतात ते बहुरंगी आणि वैविध्यपूर्ण मनोरंजन व्हावे व माहिती मिळावी यासाठी. असे टीव्हीधारक केवळ एकाच वाहिनीसाठी बहुतेक वेळ खर्च करतील ही शक्यताही फारशी पटण्यासारखी नाही. हे सर्व मुद्दे तज्ञांनी उपस्थित केले आहेत आणि तज्ञांनी त्यांची उत्तरे चौकशी पूर्ण झाल्यानंतर समाधानकारकरित्या मिळतील अशी अपेक्षा आहे. या मुद्दय़ांच्या उत्तरांवरच या कथित घोटाळय़ाचे न्यायालयीन भवितव्य अवलंबून आहे. या प्रकरणाची चौकशी जसजशी पुढे जाईल तसा त्यावर अधिकाधिक प्रकाश पडत जाईल. त्यावरून हा घोटाळा खरोखरचा आहे की विशिष्ट वाहिन्यांवर दबाव आणण्यासाठी केलेली खेळी आहे हे देखील स्पष्ट होईल. खरोखरच अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल तर तो खणून काढणे हे वृत्तव्यवसायाच्या भवितव्यासाठीही आवश्यक आहे. तेव्हा, चौकशीची वाटचाल कशी होते याकडे साऱयांचेच, विशेषतः वृत्त व्यवसायाशी संबंधित लोकांचे बारकाईने लक्ष असेल हे निश्चित.
Previous Articleसर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके…(.सुवचने)
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








