ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित पुणे च्या अध्यक्षपदी विद्या लक्ष्मण पवार यांची निवड झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या हडपसर येथील महात्मा फुले विद्यालयात पवार या कार्यरत आहेत.
संस्थेची पदाधिकारी निवड प्रक्रिया उपनिबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संस्थेच्या उपाध्यक्षपदी महाराष्ट्र विद्यालयाचे नरेंद्र सारंगधर नागपुरे, सचिवपदी भारत इंग्लिश स्कूलमधील गुलाब गंगाराम नेटके आणि खजिनदारपदी पी.ई.एस.मॉडर्न गर्ल्स हायस्कूल पुणे 5 च्या डॉ.उज्वला अनिल हातागळे यांच्ची नियुक्ती झाली आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष संजय सातपुते आणि विजय कचरे यांनी नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन केले आहे.
नवनियुक्त अध्यक्षा विद्या पवार म्हणाल्या, शिक्षकांसाठी कार्यरत असलेली ही पतपेढी सलग 75 वर्षे उत्कृष्टपणे काम करीत आहे. स्वातंत्र्यपूर्ण काळापासून सन 1945 साली शिक्षकांना मदत करण्याच्या दृष्टीने पतपेढीची स्थापन झाली. मॉडर्न हायस्कूलमधून या कार्याचा श्रीगणेशा झाला. आजमितीस पुण्यातील 190 शाळांमधील शिक्षक संस्थेशी जोडले गेले आहेत. यापुढेही शिक्षक पतपेढीही केवळ शिक्षकांची पत सुधारण्याचे नाही, तर समाजामध्ये चांगले कार्य करण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सर्व संचालकांनी नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष संजय सातपुते यांनी सर्वांचे आभार मानले.