वृत्तसंस्था/ माद्रीद
बेलारूसच्या साबालेन्काने ऑस्ट्रेलियाच्या टॉप सीडेड ऍश्ले बार्टीचा अंतिम सामन्यात पराभव करत माद्रीद खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद पटकाविले. गेल्या महिन्यात स्टुटगार्ट स्पर्धेत बार्टीने अंतिम सामन्यात साबालेन्काचा पराभव करत विजेतेपद मिळविले होते. या पराभवाची परतफेड साबालेन्काने माद्रीद स्पर्धेत केली.
शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात बेलारूसच्या 23 वर्षीय साबालेन्काने ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचा 6-0, 3-6, 6-4 असा पराभव केला. आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील आपले सर्वात मोठे विजेतेपद असल्याची प्रतिक्रिया साबालेन्काने सामन्यानंतर व्यक्त केली. ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत आतापर्यंत साबालेन्काला चौथी फेरी पार करता आलेली नाही. आता ती प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने 2019 साली प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती.









