वार्ताहर / एकंबे :
नवी मुंबईच्या सिडको झोनमध्ये माथाडी कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाला गती दिली आहे. आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे माथाडी कामगारांचे दैवत स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीच्या अगोदरच घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
मंगळवार दि. 8 फेब्रुवारी रोजी सिडकोच्या नवी मुंबई येथील कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापक बैठकीत माथाडी कामगारांच्या घराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच निर्णय देखील घेण्यात आले. वरिष्ठ अधिकारी फैयाज शेख, महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, माथाडी मंडळाच्या ग्रोसरी बोर्डाचे चेअइरमन वाघ, ट्रान्सपोर्ट बोर्डाचे चेअरमन खरात, रेल्वे बोर्डाचे चेअरमन दाभाडे, आयर्न बोर्डाचे चेअरमन व्हनगळकर, भाजी बोर्डाच्या सचिव श्रीमती खोत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदे यांनी सांगितले की, चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध होण्यासाठी जागतिक मानांकन असलेल्या कंपन्यांना कामे दिली आहेत. दोन प्रकल्पांमधून 40 ते 45 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. ही योजना प्रत्येक बोर्डाकडून राबविण्यात येणार असून, संबंधित बोर्डाकडे माथाडी कामगारांनी अर्ज केल्यानंतर त्याची छाननी होणार आहे, त्यानंतर सिडकोच्या माध्यमातून घरे वाटप केली जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर कामगारांना त्यांच्या मागणीनुसार शासनाच्या बोर्डाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने घराचे वाटप केले जाणार आहे.
माथाडी कामगारांना घरासाठी लागणारे कर्ज व इतर नियोजन देखील करण्यात आले आहे. माथाडी कामगारांचे दैवत स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीच्या अगोदरच घरांबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.









