काही महिन्यांपूर्वी युरोपियन देशांमध्ये ‘कोरोना’ने भयंकर रूप धारण केले असताना, सर्व जगाचे डोळे तेथील घडामोडीकडे लागलेले होते. इराण, इराक यासारखे आखाती देश सर्वसामान्यांना तेलाचे साठे आणि युद्ध या पार्श्वभूमीवर माहीत असतात. ‘कोरोना’ संक्रमणाच्या काळात इराणमध्ये ‘प्राथमिक आरोग्य निगे’ (प्रायमरी हेल्थ केअर)ला बळकटी देत सार्वजनिक आरोग्यासाठी समूह सहभागाचा एक आदर्शवत आरोग्य उपक्रम राबविला गेला. या उपक्रमाची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने त्यांचे जाहीर कौतुकही केले.
‘कोरोना’ संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात एन 95 मास्क, व्यक्तिगत सुरक्षा साधने (पीपीई किट), तपासणी साहित्य (किट) यासारख्या वैद्यकीय संसाधनांची मागणी संपूर्ण जगभरात होती. त्यांचे उत्पादन मात्र मुबलक नव्हते. अविकसित वा विकसनशील राष्ट्रांमध्ये त्यांचा तुटवडा भासणे साहजिकच होते. इराणलाही या वैद्यकीय संसाधनांची कमतरता भेडसावत होती. उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थचक्रही मंदावले होते. त्यातच तिथल्या राष्ट्रीयीकृत बँकेने याच काळात वैद्यकीय उपकरणांशी संबंधित आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले होते. या सर्वांचा परिणाम तिथल्या सार्वजनिक आरोग्य सेवेवर झाला नसता तर नवलच. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा प्रकोप झालेल्या राष्ट्रांमध्ये इराणचाही समावेश होता. 19 फेब्रुवारी 2020 ला तिथे दोन रुग्ण आढळले होते. मार्च 2020 पर्यंत उच्चांक गाठत रुग्णांची संख्या दिवसाला 3,200 पर्यंत पोहोचली होती. सर्वांपुढेच मोठे आव्हान उभे राहिले होते. ही परिस्थिती हाताळताना आरोग्य कर्मचारीही थकून जात होते. त्यावेळी समूह सहभागातून आरोग्य ही ‘मात्रा’ अचूक लागू पडली. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची काळजी घेणे ही संकल्पना कोरोनाला हाताळण्यात मोठय़ा प्रमाणात उपयुक्त ठरली. प्रत्येक घरापर्यंत आरोग्य सुविधा, आरोग्य साक्षरता, प्रतिबंधात्मक उपाय, लवकर आणि अचूक निदान व उपचार, आदि गोष्टी तिथल्या आरोग्य सेवकांनी समर्पित भावनेने पोचवल्या. समूह संसाधनांचा वापर करीत त्यांनी ‘कोरोना’चे संक्रमण आणि गुंतागुंत यशस्वीरित्या हाताळली.
इराणमधील आरोग्य व्यवस्था 1979 च्या क्रांतीनंतर, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या एकत्रित प्रयत्नांतून स्थापन झालेली आहे. कोविड-19 चे संक्रमण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिथली आरोग्य व्यवस्था, कोरोनाच्या आपत्कालीन स्थितीत सार्वजनिक आरोग्य सेवा देण्यासाठी सुसज्ज झाली होती. कोरोना संक्रमणामुळे उद्भवणारे संभाव्य धोके, गुंतागुंत टाळण्यासाठी प्रयोगशाळा, नियमावली, कायदे इत्यादि गोष्टींवर काम झाले होते. आधुनिक तंत्रज्ञान, उपकरणे यांनी सज्ज असलेली तेथील 60 वैद्यकीय महाविद्यालये ‘कोविड-19’ वरील उपचारांसाठी तयार करण्यात आली होती. मोठय़ा (मॅक्रो) स्तरापासून ते सूक्ष्म (मायक्रो) स्तरापर्यंत सर्व पातळय़ांवर ‘कोविड-19’ला हाताळण्यासाठीचे नियोजन करण्यात आले होते.
इराणमधील राष्ट्रीय प्रमुख कार्यक्रम ‘प्राथमिक आरोग्य निगा’ हा ‘एक घर एक आरोग्य कार्यकर्ता’ या ब्रीदवाक्मयाने ओळखला जातो. कोविडने महामारीचे रूप धारण करण्याआधी तिथल्या आरोग्य मंत्रालयाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमाअंतर्गत सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. लोकांना सहज सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, कोविडचा अधिक धोका असणाऱया लोकसंख्येवर बारकाईने लक्ष ठेवणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ आहे. प्राथमिक आरोग्य निगा कार्यक्रमाचे सातत्याने मूल्यमापन होत आहे. परिणामी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत काही त्रुटी लक्षात आल्यास त्या दूर करण्यासाठी आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपयोग होत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ‘हातांची स्वच्छता’ आणि ‘व्यावसायिक व्यवस्थापनातील उणिवा’ भरून काढण्यासाठी, सुरू झालेल्या ‘द प्रायमरी हेल्थ केअर मेजरमेंट ऍण्ड इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम’ची मदत झाल्याचे तिथल्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. कोविडच्या उदेकामध्ये ‘प्राथमिक आरोग्य निगे’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘ईच होम वन हेल्थ पोस्ट’ उपक्रमामुळे रुग्णालयात केवळ भीतीपोटी होणारी गर्दी टाळता आली, असे तिथल्या काही अभ्यासकांचे मत आहे.आपल्याकडे ज्याप्रकारे ‘प्राथमिक आरोग्य केंदे’ आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण इराणमध्ये सर्वप्रथम आरोग्य सेवा देणारी ‘सर्वसमावेशक आरोग्य केंदे’ आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात ही आरोग्य केंदे ‘प्राथमिक आरोग्य निगे’ ने जोडली गेली आहेत. ज्यामध्ये आवश्यक आरोग्य सुविधांबरोबरच कोविडच्या रुग्णांना प्राथमिक पातळीवरील सहाय्य देण्याची सुविधाही आहे. साहजिकच मोठय़ा रुग्णालयांवरील येणारा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. प्राथमिक आरोग्य निगा यंत्रणेअंतर्गत असणाऱया ‘सर्वसमावेशक आरोग्य केंद्रां’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड’, ‘सेल्फ असेसमेंट पोर्टल’ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संशयित रुग्णांचा मागोवा घेणे, शोध घेणे अधिक सोपे झाले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी वेगवेगळय़ा भागातील नागरिकांच्या आजारांचे इतिहास, लोकसंख्याशास्त्रीय संगणकीय नोंदीही ठेवल्या आहेत. त्यामुळे अति जोखीमयुक्त रुग्ण, मध्यम आजाराकडून गंभीर आजाराकडे जाणारे कोविडचे रुग्ण तसेच रुग्णालयात दाखल करण्याची गरज असणाऱया रुग्णांचा पाठपुरावा घेण्यास मदत होत आहे. या संगणकीय यंत्रणेमध्ये कोविड संशयाची पुष्टी मिळणाऱया लोकांना ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून घेण्याचा संदेश मोबाईलवर पाठवला जातो. समुदायातील कोविड संशयितांचा, अति जोखीमयुक्त लोकांचा फोनद्वारे वा प्रत्यक्षात पाठपुरावा घेणे हा तिथल्या ‘प्राथमिक आरोग्य निगे’ च्या कर्मचाऱयांचा नित्यक्रमच आहे. इराणच्या तुलनेत आपली लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार मोठा आहे. आपणदेखील कोरोना संक्रमण काळात बऱयाचअंशी संयत व जबाबदारीची वागणूक ठेवली. भविष्यात कोविडसारखी आणखी कितीतरी संक्रमणे होतील. कुपोषण, माता-बाल मृत्यु, असांसर्गिक आजाराचे वाढते प्रमाण यांच्याशी तर आपण आधीपासूनच लढत आहोत. इराणमध्ये लोकसहभागातून आरोग्य भान आणण्याचे काम शासकीय प्रयत्नातून होत आहेत. हे काम आपल्याकडे मागील 30 वर्षांपासून वेगवेगळय़ा स्वयंसेवी संस्थांद्वारे होत आहे. (याचा उल्लेख मागील लेखात आहे) भौगोलिकरित्या विखुरलेले हे काम आधुनिक तंत्र-प्रशिक्षणाची जोड देऊन, शासकीय पातळीवर सार्वत्रिक स्वरुपात राबविले गेले तर कोविडसारख्या संकटांनी आपण भविष्यात कधीही डगमगून जाणार नाही.
डॉ. स्वाती अमराळे-जाधव








