प्रतिनिधी / मडगाव :
जन्मदात्या आईचा वृद्धापकाळी सांभाळ न करणाऱया मुलाविरुद्ध कुंकळ्ळी पोलिसांनी विविध कायद्याखाली गुन्हा नोंद केला असून यातून वृद्ध पालकांचा त्यांच्या उतारवयात सांभाळ न केल्यास कदाचित उद्या तुम्हीही आरोपी व्हाल हाच संदेश यातून समाजाला दिला गेला आहे.
मडगाव विभागाचे पोलीस अधीक्षक सेराफिन डायस यांच्याकडे संपर्क साधला असता ज्या मातेने आपल्या मुलाला लहानाचे मोठे केले आणि मोठा झाल्यावर त्याच मातेचे या ना त्या कारणामुळे पालन न करणाऱया एका विवाहीत मुलाविरुद्ध आम्ही त्वरित गुन्हा नोंद केला असल्याची माहिती दिली.
सदर महिला चिंचोणे परिसरातील असून माता वृद्ध झाल्याचे पाहून आणि तिच्या देखभालीची कटकट नको म्हणून तिच्या मुलाने व सुनेने या वृद्धेला दुसरीकडे ठेवण्याचे कृत्य केले होते.
या वृद्धेला तिच्या हक्काच्या घरात ठेवण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱयांनी दिलेला असतानाही मुलाने जिल्हाधिकाऱयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले होते. मातेचा पालन पोषणाचा खर्च म्हणून दरमहा प्रत्येकी 3 हजार रुपये देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नव्हती.
या एकंदर प्रकरणाची माहिती मडगाव उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सेराफिन डायस यांच्या कानी आली तेव्हा मातेला घराबाहेर ठेवणाऱया चिंचोणे परिसरातील त्या विवाहीत मुलाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कुंकळ्ळी पोलिसांनी या प्रकरणातील विवाहीत मुलाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 341, 504, 506 (2) कलमाखाली तसेच पालक व ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ व कल्याण करणे या कायद्याच्या 24 व्या कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (हे घरगुती प्रकरण असल्यामुळे मातेचे व मुलाचे नाव राखून ठेवण्यात आलेले आहे.)









