एल्गार सामाजिक साहित्य परिषदेतर्फे कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
मातृभाषेतून घेतलेले शिक्षण लवकर आत्मसात होते. मातृभाषा मुलांच्या विकासाला पोषक असल्याने सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागत नाही. आपण आपल्या मातृभाषेबरोबर इतर भाषांचा देखील आदर केला पाहिजे, असे विचार कागवाड येथील शिवानंद कॉलेजचे प्रा. अमोल पाटील यांनी काढले.
एल्गार सामाजिक साहित्य परिषद पुणे शाखा बेळगाव आणि रान फिल्म प्रॉडक्शन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक मातृभाषा दिन व मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते ‘मातृभाषा आणि आजच्या काळातील समाजावर होणारा परिणाम’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम जत्तीमठ येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी ज्ञानेश्वर पाचखंडे होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रोहन कुंडेकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी कवी चंद्रशेखर गायकवाड, नारायण पाटील, मारुती शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले. एन. एन. शिंदे यांनी आभार मानले.