स्वप्नील घाग / शृंगारतळी :
आधुनिक युगात लोप पावत चालणाऱया कुंभार व्यवसायाला आकार देण्याची परंपरा 95 वर्षीय आजी जोपासताना दिसत आहेत. गुहागर तालुक्यातील पालपेणे गावातील रुक्मिणी नांदगावकर या आजी आजही पारंपरिक पध्दतीने फिरत्या चाकावर मातीला आकार देत अनेक प्रकारची मातीची भांडी घडवत आहेत व यातूनच आपला संसाराचा गाडा हाकत आहेत.
गेल्या 60 वर्षापासून आजींचा हा कुंभारकामाचा व्यवसाय अखंडपणे सुरु आहे. त्यातून येणाऱया पैशातून त्यांच्या संसाराचं चाकही त्यापुढे हाकत आहेत. खाणीतून माती आणून त्यापासून उत्तम प्रकारची मडकी, चुली, खापर, लग्न विधीत लागणारे कर, खारवी समाजाच्या लग्नात वापरली जाणारी बोंडल यांसह अनेक प्रकारची मातीची भांडी या आजी आजही मोठय़ा हिमतीने घडवताना दिसत आहेत. वयाच्या 16 व्या वर्षापासून त्या या व्यवसायात आहेत. आजींना एकूण 4 मुले आहेत. त्यांचे विवाह झाल्यावर ते नोकरीनिमित्त गावाबाहेर आहेत. एक मुलगा अपंग आहे तो आजीसह गावातच एकत्र राहत आहे. त्याची पत्नी आजीला जमेल तेवढे हातभार लावीत तिच्या कामात मदत करीत आहे.
माणूस जन्माला आल्यावर लागणाऱया पणतीपासून ते मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी वापरल्या जाणाऱया मडक्यापर्यंतच्या सर्व वस्तू आजी आजही तेवढय़ाच आकर्षक व मजबूत बनवतात. आजींची ख्याती तालुक्यात एवढी पसरली आहे की, लग्न विधीसाठी लागणारे कर, उन्हाळ्यातील मडकी, नारळाची माडी काढण्यासाठी लागणारी मडकी, देवाची धूपारत, जेवणाची भोगवणे, मच्छीमार समाजात लग्नात लागणारी भांडी ज्याला आरा बोंडला असे म्हटले जाते या सर्व प्रकारची भांडी आजी स्वतः बनवतात. 5 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत किंमत असल्यामुळे आजीच्या भाडय़ांना गावागावांतून चांगली मागणी आहे. आजींच्या उतारवयातील ही व्यवसायातील जिद्द पाहून गावातील तरुणदेखील आवाक होतात. आजींच्या जिद्दीतून त्यांना सकारात्मक ऊर्जादेखील मिळत असल्याचे येथील तरुण सांगतात.
काळ बदलत चालला असल्यामुळे जग आधुनिक बनत चालले आहे. पूर्वीच्या मातीच्या भांडय़ांची जागा प्लास्टिक आणि मेटलने घेतल्याने पारंपरिक असलेला कुंभार व्यवसायदेखील आर्थिक उलाढाल होत नसल्यामुळे जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पालपेणे गावातील 95 वर्षाच्या या आजी लोक पावत चाललेला कुंभार व्यवसाय त्याच दमाने जोपासत आहेत. त्यातून त्या आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. आजींची ही जिद्द हिंमत हरुन व्यसनाच्या आहारी जाणाऱया तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारी तर आहेच. शिवाय जगण्याची नवी प्रेरणा देखील देणारी ठरली आहे.









