- मैथिली आडकर, संदिप बर्वे यांना रमाई रत्न पुरस्कार प्रदान
ऑनलाईन टीम / पुणे :
माता रमाई ही त्याग, समर्पण आणि निष्ठेचे प्रतिक आहे. त्यांनी केलेल्या त्यागाच्या प्रेरणेतून बाबासाहेबां सारखे व्यक्तिमत्व घडले. माता रमाईंची बाबासाहेबांना खंबीर साथ होती म्हणून बाबासाहेब निश्चिंत मनाने कार्य करु शकले, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 86 व्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या रमाई रत्न पुरस्काराने आज रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आडकर फाैंऊंडेशनच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असलेल्या मैथिली प्रमोद आडकर आणि सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध व्याख्याते संदिप बर्वे यांना ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते घरगुती छोटेखानी कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पवार बोलत होते.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लता राजगुरु प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होत्या. तसेच यावेळी ॲड. प्रमोद आडकर, महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे निमंत्रक विठ्ठल गायकवाड, युवा नेतृत्व कुणाल राजगुरु आदी मान्यवर उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले की, आज बुद्धजयंती आहे. बुद्ध म्हणजे शांती, अपरिग्रह, त्याग आणि सेवाभावाचे प्रतिक. आजच्या दिवशी माता रमाईच्या नावाने पुरस्कार प्रदान केला जात आहे, हा खऱ्या अर्थाने दुग्धशर्करा योग आहे. शांती, अपरिग्रह, त्याग आणि सेवाभाव ही मूल्य आजच्या व्यावहारिक जगात नामशेष होत असतांना माता रमाईचे पुरस्काररुपी स्मरण करून त्यांना वंदन करणे काैतुकास्पद आहे.
पुरस्कारार्थी मैथिली प्रमोद आडकर आणि प्रसिद्ध व्याख्याते संदिप बर्वे यांच्यासह ॲड. प्रमोद आडकर, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त केले.








