प्रतिनिधी / सातारा :
माण-खटाव या दुष्काळी तालुक्यात अनेक पक्षी आहेत. त्या सर्व पक्षांचा सर्व्हे करण्याची घोषणा दि. 8 मे प्रदेशनिष्ठ पक्षी दिन 2021 चे औचित्त साधून करण्यात आली आहे. लवकरच कोरोनाच्या परिस्थितीनंतर हे कार्य नियमित सुरु होईल, अशी माहिती पक्षीअभ्यासक चिन्मय सावंत यांनी दिली. त्यामुळे माण-खटाव तालुक्यातील दुर्मिळ पक्षांची माहिती उजेडात येणार आहे.
माण-खटाव सातारा जिल्हातील पूर्वेकडील दुष्काळी भाग, पण गेल्या अनेक वर्षापासून इथे जलसंधारणाची कामे झाली व होत आहेत. त्यामुळे तिथल्या जैवविविधेत आणखी भर पडली. अनेक वर्षापासून दुर्लक्षीत असा हा प्रदेश. अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान बनले आहे. विस्तीर्ण गवताळ माळराने पाणथळी, शेतीप्रदेश या विविध अधिवासात पक्ष्यांच्या अनेक प्रजातींच्या अधिवास आढळून येत आहे. नदी येरळा – माणगंगेच्या भूभागातून हा पक्षी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच इथल्या अधिवासांचे संरक्षण व संवर्धन होईल. गवताळ, शेतीप्रदेश तसेच पाणथळीतील अधिवासातील पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीनेगणना, नोंदी, तसेच त्यांच्या अधिवासाचे संवर्धनासाठी ही पक्षीगणना करण्याचा विचार करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात पक्षी अभ्यासक, पक्षीमित्र, स्थानिक ग्रामस्थ, वनविभाग, विद्यार्थी इ. तसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व बर्ड कांऊट इंडियाच्या मार्फत मार्गदर्शन व सहकार्य लाभणार आहे.
सर्वेक्षण ई-बर्ड या पक्षीविषयक संकेतस्थाळावर अपलोड करण्यात येणार आहे. अनेक उत्साही पक्षीनिरीक्षक व तज्ञ अभ्यासू व्यक्तींना घेऊन ही गणना करण्यात येणार आहे. पुढे राष्ट्रीय पातळीवर माण-खटाव चे पक्षी वैभव” या प्रकल्पावर संशोधन पत्र तयार करण्यात येणार आहे. जे भविष्यात माणदेशाच्या पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनसाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे, असे सावंत यांनी सांगितले.









