प्रतिनिधी/दापोली
दापोलीतील दापोली तालुका मल्लखांब संघ व त्रिवेणी संगम ग्रुप आसूद यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरात नुकतीच माणूसकीची खिडकी हा गरिबांना मोफत कपडे पुरवणारा उपकम सुरू करण्यात आला. याच्यापुढे एक पाऊल टाकत दापोली नगर पंचायतीने नुकताच माणूसकीची भिंत हा गरिबांना मोफत वस्तू देणारा उपकम सुरू केला.
दापोलीतील माणूसकीची खिडकीला दापोलीकरांनी चांगले कपडे पुरवून उत्तम पतिसाद दिला. आता दापोली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या संकल्पनेतून माणूसकीची भिंत दापोली नगर पंचायतीच्या आवारात उभी राहिली आहे. दापोलीचे नगरसेवक खालिद रखांगे यांच्या हस्ते या अनोख्या भिंतीचा शुभारंभ करण्यात आला.
याबाबत माहिती सांगताना मुख्याधिकारी महादेव रोडगे म्हणाले की, दापोली नगर पंचायतीने सुरू केलेला माणूसकीची भिंत हा उपकम वस्तूंशी संबंधित आहे. शिवाय गरिब विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा उपकम सुरू करण्यात आला आहे. आपल्या घरी जर अर्धवट वापरलेल्या पेन्सिल्स, खोडरब्बर, कंपासपेट्या, स्केचपेन्स, दप्तर, पुस्तके व इतर कोणत्याही शालोपयोगी वस्तू असतील तर त्या फेकून न देता दापोली नगर पंचायतीच्या स्वागत कक्षात आणून द्यायच्या आहेत. तसेच नविन आणल्यावर जर जुने फर्निचर टाकावू झाले असेल तरी ते दापोली नगर पंचायतीत आणून दिल्यास ते नगर पंचायतीत मांडून ठेवण्यात येणार आहे. ते ज्यांना हवे असेल त्यांनी दापोली नगर पंचायतीतून केव्हाही विनामुल्य घेवून जाता येणार आहे. याकरिता दापोलीकरांनी सहकार्य करावे असा आवाहन देखील महादेव रोडगे यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी त्यांच्या समवेत नगराध्यक्षा परविन शेख यांच्यासह सर्व पक्षांचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या माणूसकीच्या भिंतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.









