खानापूर : येथील मराठा मंडळ महाविद्यालयाच्या मैदानावर माणिक विंग्स फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा चव्हाटा तरुण मंडळ निंगापूर गल्लीच्यावतीने ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगाव जिल्हय़ाबरोबरच महाराष्ट्रातील नामवंत अशा एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा अंतिम सामना दिनेश खणगावकर एफसी विरुद्ध एसजेएम मन्सापूर या संघात अत्यंत अटीतटीचा झाला. यामध्ये दिनेश खणगावकर एफसी संघाने मन्सापूर संघावर 3-0 ने मात करून माणिक विंग्स फुटबॉल स्पर्धा जिंकली. विजेत्या संघाला 15001 रु. रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली. तसेच उपविजेत्या संघाला 7001 रु. व ट्रॉफी देण्यात आली.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रमेश जैन, गुलाब जैन, कमल जैन तसेच नगरसेवक विनायक कलाल व विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून गडहिंग्लज संघाच्या सौरभ पाटील याला तर गोळरक्षक दिनेश खणगावकर संघाचा खेळाडू श्रेयस बांदेकर व मन्सापूर संघाचा सुलेमान याला उत्कृष्ट खेळाबद्दल खास बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे समालोचन इनायत तेलगी यांनी केले.









