- मनुष्यबळाच्या तुटवडय़ामुळे कोविड रुग्णालयातील यंत्रणेची ससेहोलपट
- अंतर्गत डागडुजी, स्वच्छता, मृतदेह विल्हेवाटीसाठी ठेकेदारांकडेही नाहीत माणसे
- कोरोनाच्या अवाजवी भीतीमुळे बसतोय फटका
- तुटपुंज्या पगारावर काम करण्यास उमेदवारांचा नकार
- भरती पॉलिसीत बदल होणे आवश्यक
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लोक अधिक घाबरायला लागले असून त्यामुळे भरतीच्या जाहिराती काढूनही डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी व अन्य सहकार्यासाठी आवश्यक मनुष्यबळ मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे जिल्हा कोविड रुग्णालयात मनुष्यबळाची प्रचंड कमतरता भासत आहे. याचा फटका कोविड पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांचे नातेवाईक व थेट कोविडमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या मृतदेहांना बसू लागला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्हा कोविड रुग्णालयातील अनास्था, अस्वच्छता, निकृष्ट जेवण, खराब झालेली टॉयलेटस्, स्वॅब रिझल्ट मिळण्यास होत असलेला विलंब, डॉक्टर्स, नर्सेस, सपोर्टिंग स्टाफचा तुटवडा याबाबत अनेक व्हिडिओ, ऑडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाबद्दल लोकांच्या मनात प्रचंड चिड निर्माण झाली आहे. मात्र, या वास्तव चित्राच्या पाठीमागच्या बाबींचा विचार करणे गरजेचे वाटते. कारण या अर्धवट माहितीमुळे गेली काही महिने तहान-भूक विसरत, स्वत:चा जीव धोक्यात घालत कोविड रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जीवतोड मेहनत घेणाऱया डॉक्टर्स, नर्सेस व सपोर्टिंग स्टाफ यांच्या योगदानाची अवहेलना होण्याची शक्यता आहे.
आज दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. रोज 100 ते 200 रुग्ण पॉझिटिव्ह मिळत आहेत. त्यामुळे तुटपुंज्या मनुष्य आणि सामुग्रीत कोविड रुग्णांची ही वाढती संख्या मॅनेज करणे दिवसेंदिवस कठीण होऊन बनले आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह बनू लागले आहेत. कामाच्या प्रचंड व्यापामुळे डय़ुटीवरील नर्सेस अतिथकव्याने चक्कर येऊन पडू लागल्या आहेत. सपोर्टिंग स्टाफमधील अनेकजण बाधित झाल्याने त्यांचीही कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे एकंदर कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे मनुष्यबळ अपुरे
अशाही परिस्थितीत जीव धोक्यात घालून सेवा देऊनही डॉक्टर्स, नर्सेसना टिकेचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे ही यंत्रणादेखील मनोमन खचू लागली आहे. यात प्रशासनाच्या कार्यपद्धतीत अनेक दोष आल्यामुळे हे होऊ लागले आहे. डॉक्टर्स हवेत म्हणून वृत्तपत्रांतून जाहिरात प्रसिद्ध केली असता एक-दोन डॉक्टर वगळता याला प्रतिसाद यायला लागला. अनेक खासगी नर्सेसना भरती होण्याचे आवाहन केले. पण तुटपुंजा पगार, त्यात विमाकवच नसल्याने नर्सेस भरती व्हायला तयार नाहीत. रुग्णालयातील डागडुजीची कामे पूर्ण करण्यासाठी निविदा काढून ठेका देण्यात आला. परंतु कोविड रुग्णालयात काम करण्यासाठी ठेकेदाराकडे माणसेच उपलब्ध होऊ शकत नसल्याने डागडुजीची कामेच अडकून पडली आहेत.
त्रुटी शासनाच्या धोरणातच
मात्र, अशी परिस्थिती असली तरी प्रशासनाला हात झटकून मोकळं होता येणार नाही. आपल्या कार्यपद्धतीत बदल करावे लागणार आहेत. खरंतर डॉक्टर्स व नर्सेससाठी जाहिरात काढण्यात आली. परंतु कोरोना काळात तीन महिने काम करण्यासाठी डॉक्टर्स पाहिजेत, अशी जाहिरात असल्याने अवघ्या तीन महिन्यांसाठी कोण इथे येऊन जीव धोक्यात घालणार, असा विचार करत डॉक्टर्सनी आवाहनाकडे पाठ फिरवली. परिचारिकांच्या भरतीसाठी जाहिरात दिली. पण भरती होणाऱया परिचारिकांना अवघा 20 हजार रुपये पगार ठेवला. रुग्णालयातील कायम नर्सेस ना 60 ते 70 हजार पगार मिळत असेल आणि कंत्राटी पद्धतीने भरती केलेल्या नर्सेसना आपण अवघे 20 हजार रुपये देऊन त्यांच्याकडून काम करून घेत असू तर कोण येणार? हा खरा तर धोरणाचा प्रश्न आहे. यात प्रशासनाला काहीही करता येणार नाही. तेव्हा लोकप्रतिनिधींना आता या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधून कोरोनात सेवा देणाऱया कार्मचाऱयांना चांगले वेतन देण्याची तरतूद करायला हवी.









