लहानपणी तल्स्तोयची ‘माणसाला किती जमीन लागते’ ही गोष्ट वाचली होती. कोरोनाच्या साथीत सरकारने लॉकडाऊन केल्यावर ती आठवली. लॉकडाऊन म्हणजे थोडी जमावबंदी आणि थोडी संचारबंदी असं माझं आपलं बाळबोध मत झालंय. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी निघता येतं. पण रस्त्यावर उगीच फिरता येत नाही. .
अमेरिकेत 2009 साली मंदी आली तेव्हा पेडिट कार्ड, कर्ज वगैरेवर अवलंबून असलेला सगळा आर्थिक डोलारा कोसळला होता. आमचा मित्र हरिदास तेव्हा म्हणालेला, “सालं मी अमेरिकेचा अध्यक्ष असतो तर मंदी कधीच आली नसती. मी देशात फक्त डेबिट कार्डं ठेवली असती. नो पेडिट कार्ड. खात्यात जितके पैसे असतील तितकेच खर्च करा. दरमहा बचत करा.’’ मला अर्थशास्त्रातलं ज्ञान नसल्यामुळे मी होयबासारखी मान डोलावली होती. त्यामुळे खुष होत हरिदासने त्यावेळी चहाचं बिल दिलं होतं.
हरिदासमध्ये स्वतःच्या पैशांची बचत करण्याची प्रेरणा जाम प्रभावी आहे. नोकरीत असताना दौऱयावर गेला की त्याला टीएडीए मिळायचा. हरिदास टीएपेक्षा कमी खर्चात प्रवास करायचा आणि डीएपेक्षा कमी पैशात जेवण करायचा. उरलेले पैसे जपून ठेवायचा. ‘कंजुष इसम हाच खरा उदार असतो. कारण तो आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन बचत करतो आणि साठवलेली सगळी रक्कम वारसांना देऊन मरतो.’ अशा आशयाचं संस्कृत सुभाषित आहे. हरिदासला ते अनेकदा सुनावलं, पण त्याच्यात फरक पडला नाही.
लॉकडाऊन झाल्यावर पहिल्या दिवशी पहाटे बायकोने हरिदासला पिशवी आणि पैसे देऊन बाजारात पिटाळलं. घराजवळ दूध, भाजी वगैरे सर्व काही मिळतं. मी खरेदी केली आणि घरी निघालो. हरिदास म्हणाला, “मी नेहरू चौकातून भाज्या, फळं वगैरे घेऊन येतो. तिकडे स्वस्त मिळतात. इथे आठ दिवसांसाठी येणाऱया खर्चात तिथे पंधरा दिवसांसाठी लागणारी खरेदी होईल.’’
नेहरू चौकाला जोडून एक लांबलचक रस्ता आहे. प्रत्येक भाजीचा भाव विचारीत आणखीन स्वस्त कुठे मिळेल याचा शोध घेत हरिदास बराच वेळ लांबवर चालत गेला. तल्स्तोयच्या कथेचा नायक असा चालत जातो तेव्हा सूर्य कलत जातो आणि रात्र होते. हरिदास जसा चालत गेला तसा सूर्य वर येत गेला. खरेदी आटोपून हरिदास घराकडे निघाला तेव्हा एका चौकात पोलिसांकडून कानउघडणी आणि पुढच्या चौकात प्रसाद मिळाला.








