इचलकरंजी / प्रतिनिधी
महावितरण ने पूर्व कल्पना व नोटीस न देता घरातील वीज कनेक्शन बंद केले. याच्या निषेधार्थ माणगाव ता. हातकणगंले येथील वंचित बहुजन आघाडीचा अध्यक्ष संतोष राजमाने या युवकाने शुक्रवारी दुपारी गावातील राज्य विद्युत महावितरण उपकेंद्राच्या दारात स्वतः वर पेट्रोल ओतून पेटवून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावचे सरपंच उपसरपंच व सदस्य आणि महावितरणचे कर्मचाऱ्यानी समयसुचिकता दाखवत राजमाने यांच्या हातातील काडी पेटी काढून घेत अंगावर पाणी ओतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेने काही काळ राज्य विद्युत महावितरण उपकेंद्राच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.