तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढय़ात बुधवारी पहाटे दोन ठिकाणी दरोडा पडल्याची घटना बुधवारी दि. 22 रोजी घडली. दरोडेखोरांनी माढा येथील राधिका विनायक चवरे यांच्या घरात प्रवेश करुन कटर, चाकू, लाकडी दांडक्याचा धाक दाखवून 12 तोळे सोने चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून एकूण 3 लाख 14 हजार 300 रूपयांचा ऐवज चोरून नेला. तर दुसऱया घटनेत मिठू वाघ यांच्या घरातून अडीच लाख रुपये रोख तर 2 तोळे सोन्याचे दागिने तसेच श्रीकांत कासार यांच्या दुकानातून सुमारे पाचशे रूपयाची रक्कम दरोडेखोरांनी चोरून नेल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून फिर्यादी राधिका चवरे व त्यांचे कुटुंबीय जेवण उरकून मंगळवारी रात्री 11 वाजता झोपी गेले. दरम्यान पहाटे 3.15 वा सुमारास फिर्यादी राधिका यांना जाग आली. त्या उठून बसल्या असता समोर उजेडात 5 अनोळखी इसम हातात चाकू, लाकडी दांडके व कटर घेऊन उभे होते. त्यांना तुम्ही कोण अशी फिर्यादीने विचारणा केली असता तू शांत बस आरडाओरडा करु नको, नाही तर तुझ्या मुलाला मारीन तुझा जीव वाचवायचा नाही अशी धमकी दरोडेखोरांनी दिली.
ध्रम्यान फिर्यादी राधिका यांनी सासरे यांना नाना म्हणून आवाज दिला असता दोघे जण फिर्यादीच्या पतीच्या डोक्याजवळ बसून गळ्याला चाकू लावला तर एकाने मुलाच्या गळ्याला चाकू लावला एकजण कटर घेऊन फिर्यादीला धमकावत होता. एकाने कोणत्यातरी हत्याराने लोखंडी कपाटाच्या दांडय़ाला हिसका मारुन तोडले व लॉकर उचकटले त्यामध्ये 1 लाख 36 हजारांच्या सोन्याच्या चार तोळय़ाच्या पाटल्या, 48 हजार रुपयांचे चार तोळय़ाचे गंठण, 1 हजार 500 रुपयांची अर्धा तोळे वजनाची बोरमाळ, 37 हजार रुपयांचे एक तोळय़ाचे मिनी गंठण, 51 हजारांचे दीड तोळय़ाचे लॉकेट, 37 हजार रुपयांचे एक तोळय़ाचे फुल झुबे आणि वेल, 2 हजार रुपये किंमतीची अर्धा ग्रॅमची नथ, 1 हजार रुपयांचा चांदीचा करंडा व रोख 800 रुपये असा ऐवज चोरुन नेला.
यावेळी फिर्यादी चवरे यांनी चोरांचा पाठलाग केला परंतु दरोडेखोराने त्यांच्या हातातील लाकडी दांडके महिलेच्या डोक्यात मारले त्यामध्ये ती जखमी झाली. यावेळी घराशेजारील सर्व घरांच्या दरोडेखोरांनी कडय़ा लावल्या होत्या. त्यामुळे कोणी बाहेर येऊ शकले नाही. घटनेनंतर फिर्यादीने शेजारच्यांच्या घराच्या कडय़ा काढल्या.
याघटनेनंतर पोलिसांनी तातडीने श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले आहे. श्वानपथकाने दरोडेखोरांचा काही अंतर मागोवा घेतला. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मागील काही महिन्यांपासून माढयात चोऱया व दरोडयांचे सत्र वाढले आहे. माढयात यापूर्वी दिवसा चोऱया झाल्या होत्या. त्यामुळे या दरोडय़ाचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या घटनेमुळे नागरिकात भितीचे वातावरण आहे. याबाबत फिर्यादी राधिका चवरे यांच्या फिर्यादीवरुन माढा पोलिसांत अज्ञात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









