कुर्डुवाडी / प्रतिनिधी
देशात सर्वत्र भाजपाचा बोलबाला असताना माढा तालुका एवढा सुस्त का आहे, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. गटातटाच्या राजकारणाला कंटाळून व वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे पक्षवाढीसाठी काम करण्यास वाव मिळत नसल्यामुळे निष्क्रिय पदाधिकारी हा ठपका माथी मारुन घेण्यापेक्षा राजीनामा दिलेला चांगला म्हणून तालुकाध्यक्ष्यांसह सर्व पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.
भाजपाचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या मतदार संघातील माढा तालुक्यातील माढा नगरपंचायतीची निवडणूक झाली तरी भाजपाला पदाधिकारी मिळाला ना उमेदवार. इतकी दयनीय अवस्था माढा तालुका भाजपची झाली आहे. कुर्डुवाडी शहरात मागील दीड वर्षापासून शहराध्यक्ष निवड झालेली नाही. याबाबत एका पदाधिकाऱ्याने सांगितले की तालुकाध्यक्ष यांची इच्छा असूनही काम करण्यास गटातटामुळे अडचणी येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका पक्षाला आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कसरत करूनही हाती काही लागणार नाही. माढा नगरपंचायत सारखी परिस्थिती कुर्डुवाडी नगरपालिकेसाठीही निर्माण झाली आहे. वरिष्ठांनी जर वेळीच लक्ष घातले नाही तर तालुक्यात पक्ष नावापुरता सुध्दा शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा पातळीवरील नेत्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे (गटातटामुळे) तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यास कोणीही तयार नाहीत, तसेच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची कोणतेही काम मार्गी लागत नाहीत. कोणताही पदाधिकारी पक्षावर गटातटाच्या राजकारणामुळे खुश नाही यामुळे माढा तालुक्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष घालण्याची गरज आहे असे पदाधिकारी एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत.








