कुर्डुवाडी/ प्रतिनिधी
माढा तालुक्यात आज आणखी दोन महिला कोरोनाबाधित झाल्या आहेत. एक महिला भोसरे येथील रहिवासी आहे तर दुसरी ही रिधोरे येथील आहे. तालुक्यातील ४३ जणांचा स्वॅब काल पाठविला होता त्यामधील २२ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून यातील दोन महिला पाॅझिटीव्ह असून उर्वरित २० जण निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील बाधितांचा आकडा ३६ वर पोहचला असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी प्रशांत पलंगे यांनी सांगितले.
आज नव्याने वाढ झालेली महिला ही रोपळे ता.माढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका असून त्या भोसरे (ता.माढा ) येथे शाहूनगर परिसरात रहात आहेत. त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह येताच तालुका वैद्यकीय अधिकारी त्यांचे पथक ,भोसरेचे सरपंच अॅड धनाजी बागल व ग्रामसमिती सदस्य तेथे पोहचले. संबंधित रुग्णाचा परिसर प्रतिबंधीत केला असून त्या रुग्णाला येथील कोविड सेंटरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्याचबरोबर रिधोरे ता.माढा येथील महिला ही पूर्वीच्या रूग्णाच्या संपर्कातील असून त्यांचाही राहता परिसर प्रतिबंधित करुन उपचारासाठी कुर्डुवाडी येथील कोविड सेंटरला हलविण्यात आले आहे. संपर्कातील लोकांच्या नोंदी घेतल्या जात असून आज पूर्वीच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेतले जात आहेत.








