कारिवडे पेडवेवाडीतील युवकांचा आदर्श
प्रतिनिधी / ओटवणे:
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी कारिवडे पेडवेवाडीतील युवकांनी एकत्र येऊन माडखोल धरण परिसराची साफ-सफाई करून हा धरणाचा परिसर स्वच्छ केला. शनिवारी सकाळी सहा वाजताच चेतन गावडे, मयुर गावडे, अनिकेत बोराटे, यश गावडे, शुभम गावडे या युवकांनी माडखोल धरणाकडे जात साफसफाईस प्रारंभ केला. माडखोल धरण परिसरात पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या, कचरा व बाटल्या अशा एकूण पाच मोठ्या पिशव्या एवढा कचरा या युवकाने गोळा करीत आजच्या युवकांसमोर एक वेगळा आदर्श समोर ठेवला. युवकांच्या या आदर्शवत उपक्रमाचे माडखोलवासियांनी कौतुक केले. तसेच या धरणावर येणाऱ्या पर्यटकांनी यापुढे स्वच्छता राखावी असे आवाहन या युवकांसह माडखोल गावचे सामाजिक युवा कार्यकर्ते लखन आडेलकर यांनी केले आहे.









