पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्याकडून मारहाण, शिवीगाळ : फरफटत नेऊन गाडीत कोंबले : ग्रामस्थांनी केला पोलीस चौकीवर हल्लाबोल
वाळपई / प्रतिनिधी
होंडा येथे खनिजमालाची वाहतूक अडविल्यामुळे चर्चा करण्यासाठी बोलाविलेले होंडाचे माजी सरपंच व विद्यमान पंचायत सदस्य सुरेश माडकर व स्थानिक नागरिक सागर नाईक यांना होंडा पोलीस स्थानकावर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये कोंबून वाळपई पोलीस स्थानकावर नेण्यात आले. त्याच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी होंडा पोलीस चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काल बुधवारी होंडय़ात पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यातील धुमश्चक्रीमुळे वातावरण तंग बनले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या निलंबनाच्या मागणीवरुन रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरुच होते.
पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थिती आंदोलन मागे न घेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू ठेवले होते. त्याचाच भाग म्हणून तीन तास होंडा रस्ता रोखून धरण्यात आला. दुपारी तीन वाजता तो मोकळा करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत स्थानिक नागरिकांचा जमाव होंडा पोलीस चौकीवर ठाण मांडून होता.
सोनशी येथे अडविली खनिज वाहतूक
सोनशी येथील खाणीवरून चौगुले कंपनीची सध्या वाहतूक सुरू असून ती करणारे ट्रक ताडपत्री न घालता ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याची दखल घेऊन सुरेश माडकर, शिवदास माडकर व स्थानिक नागरिकांनी ही वाहतूक काल बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आजोबा देवस्थानाकडे अडवून धरली, तेथून हा तणाव निर्माण झाला.
यासंदर्भातील माहिती मिळताच वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान नागरिकांनी आपल्याला त्रास होत असल्याने ही वाहतूक बंद करावी अशा प्रकारची मागणी केली. नंतर सुरेश माडकर व सागर नाईक यांना निरीक्षकांनी होंडा चौकीवर नेले. उपस्थित असलेल्या नागरिकांनीही होंडा पोलीस चौकीकडे धाव घेतली.
होंडा पोलीस चौकीसमोर ग्रामस्थांचा रास्ता रोके
होंडा पोलीस चौकीवर निरीक्षक सागर एकोस्कर यांनी सुरेश माडकर, सागर नाईक यांना मारहाण केली. नंतर त्यांना फरफटत पोलीस वाहनांमध्ये कोंबून वाळपईच्या पोलीस स्थानकावर नेण्यात येत असता नागरिकांनी त्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना दाद न देता त्यांना गाडीमध्ये कोंबून पोलीस स्थानकावर नेण्यात आले. यासंदर्भातील माहिती होंडा परिसरामध्ये पसरताच मोठय़ा प्रमाणात नागरिक होंडा पोलीस चौकीसमोर जमा झाले. दोघांनाही होंडा चौकीवर आणा अन्यथा रस्ता रोको करणार असा इशारा देण्यात आला. मात्र दिलेल्या वेळेत त्यांना हजर न केल्यामुळे दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी होंडा पोलीस चौकीसमोर वाळपई – होंडा दरम्यानच्या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
माफी मागितल्यानंतर रास्ता रोको मागे
यावेळी शिवदास माडकर यांनी मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध केला. एका राजकीय नेत्यावर व लोकप्रतिनिधीवर अशाप्रकारे हल्ला करणे बरोबर आहे का असा सवाल करून जोपर्यंत त्यांना होंडा पोलीस चौकीवर आणत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे न घेण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे होंडा भागातून वाळपई भागाकडे जाणाऱया वाहनांच्या रांगा लागल्या. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास निरीक्षक सागर यांनी माफी मागितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको मागे घेऊन वाहनांना रस्ता मोकळा करुन दिला. डिचोली उप अधीक्षक गुरूदास गावडे यांच्यासमक्ष निरीक्षक सागर एकोस्कर यांनी मारहाण करण्यात आलेल्या सुरेश माडकर, सागर नाईक व उपस्थितांची माफी मागितली.
सागर एकोस्कर यांच्या निलंबनाची मागणी
नागरिकांची आक्रमकता पाहून दोघानांही वाळपईतून होंडा पोलीस चौकीसमोर आणले असता नागरिकांनी टाळय़ा वाजवून त्यांचे जोरदार स्वागत केले. मात्र जोपर्यंत पोलीस निरीक्षकांना निलंबित करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिला. शिवदास माडकर, माजी नगराध्यक्ष प्रवीण ब्लॅगन, नगराध्यक्ष यशवंत माडकर, माजी नगरसेवक रियाज खान, पिसुर्ले पंचायतीचे पंच देवानंद परब व इतरानी यावेळी उपस्थितांच्यावतीने बोलताना जोपर्यंत निरीक्षकांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा दिला.
अनेक ठिकाणांहून आणला मोठा पोलीस फौजफाटा
खबरदारीची उपाययोजना म्हणून मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये पेडणे, म्हापसा, डिचोली विभागाच्या पोलीस निरीक्षकांनाही पाचारण करण्यात आले होते. सत्तरीचे मामलेदार दशरथ गावस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण काही प्रमाणात निवळले होते. मात्र पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आल्यानंतर जमाव पुन्हा एकदा संतप्त झाला.
मारहाण, शिवीगाळ करणाऱयाला शिक्षा व्हायलाच हवी
उत्तर गोव्याचे अधीक्षक उत्कृष्ट प्रसन्न घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुरेश माडकर व सागर नाईक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मात्र जोपर्यंत निरीक्षकाचे निलंबन होत नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. त्यांनी ज्या शब्दात शिवीगाळ केलेली आहे त्यांना सजा ही व्हायलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. निरीक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात येईल, त्यासाठी मुदत हवी अशा प्रकारची विनंती पोलीस उपअधीक्षक गुरुदास गावडे, बार्देश उप अधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पेडणे निरीक्षक जिवबा दळवी यांनी केली. मात्र उपस्थितांनी त्याला अजिबात दाद दिली नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत यांच्या निलंबनावर आंदोलनकर्ते अडून राहिले होते. †िशवदास माडकर यांनी यावेळी उपस्थितांसमोर बोलताना निरीक्षक सागर यांच्यावर टीका केली. एका ज्ये÷ लोकप्रतिनिधीला मारहाण करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. कायदय़ाच्या रक्षकांकडून लोकप्रतिनिधीवर हल्ला करण्याचा प्रयत्न निंदनीय आहे. अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ करून पोलीस निरीक्षकानी पोलीस खात्याची मोठय़ा प्रमाणात बदनामी केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे अशा प्रकारची मागणी माडकर यांनी केली.









