रायपूर / ऑनलाईन टीम
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये शनिवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यापासून कोब्रा कमांडो दलाचे जवान राकेश्वर सिंह मनहास बेपत्ता आहेत. बेपत्ता जवान आपल्या ताब्यात आहे, असा दावा नक्षलवाद्यांनी केला आहे. त्यानंतर आता बेपत्ता जवानाच्या निरागस मुलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ही चिमुकली डोळ्यातीस अश्रू पुसत माझ्या वडिलांना सोडून द्या, अशी विनंती करताना दिसत आहे. या व्हिडिओत बेपत्ता जवानाचे अन्य नातलगही दिसत आहेत.
छत्तीसगडचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी म्हटले आहे की, बंधक असलेल्या जवानच्या मुलीचा आवाज ऐकून मन सुन्न झाले आहे. त्यांच्या कुटुंबाच्या वेदनेची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. जवानाला सुरक्षित परत आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. तुझे वडील एक शूर योद्धा आहेत. तू देखील त्यांच्याप्रमाणे संयम आणि धैर्य ठेव.
नक्षलवाद्यांनी सोमवारी बिजापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश मिश्रा आणि पत्रकार राजा राठोड यांना फोन करुन बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.
शनिवारी झालेल्या या हल्ल्यात एकूण 22 जवान हुतात्मा झाले. यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे आठ जण तर कोब्रा कमांडो दलाचे सात कमांडो व जिल्हा राखीव दलाचे आठ , विशेष कृती दलाचे सहा जण यांचा समावेश आहे. एक जवान बेपत्ता आहे.