मुंबई/ ऑनलाईन टीम
गेले काही दिवस आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभर घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकी दरम्यान पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केली आहे. बुधवार दिनांक 30 जून रोजी घोंगडी बैठकीच्या समारोपानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांना टार्गेट करत ”रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशिबात” अशा भाषेत टीकास्त्र सोडले होते. यानंतर आमदार पडळकर यांच्या गाडीवर सोलापूर येथे दगडफेक झाली.
या आपल्यावर झालेल्या दगडफेकीचा पडळकरांनी व्हीडिओ व्हायरल करत राष्ट्रवादीवर पुन्हा हल्ला बोल केला आहे. यावेळी पडळकर म्हणाले, प्रस्थापितांचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला आहे. माझ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यांना मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करून जर तुमचे साहेब पंतप्रधान होणार असतील, तर हा तुमचा गोड गैरसमज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्यावर बोलताना भाषा सांभाळा असा स्पष्ट शब्दात पडळकर यांना इशारा दिला आहे. पुन्हा पडळकरांनी टीकासत्र सुरुच ठेवल्याने राष्ट्रवादी याला कसे प्रतिउत्तर देते हे पाहणे आता औत्सूक्याच ठरणार आहे.








