प्रतिनिधी / सांगली
एसटीची जबाबदारी ही सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची असून तिच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी ‘माझी एसटी माझी जबाबदारी’ हे ब्रीद सर्वांनी जपावे, असे आवाहन मुंबई येथील महाव्यवस्थापक (वाहतूक) सुहास जाधव यांनी केले.
सांगली आगारात नुकतीच जाधव यांनी सदिच्छा भेट दिली असता त्यांनी आगारातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे, सुरक्षा दक्षता अधिकारी सुरेश चव्हाण, कनिष्ठ आगार व्यवस्थापक दिपक हेतंबे, स्थानक प्रमुखा शितल माने, सहायक वाहतुक निरिक्षक अनिता सलगर, तेलवेकर, लेबर ऑफिसर राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जाधव म्हणाले, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षामध्ये एसटीचे उत्पन्न बुडाल्याने मोठे नुकसान सोसावे लागले. दोन वर्षे उन्हाळी हंगाम, सणांचा काळ वाया गेला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची पगार कपात, इंधन खर्च, उत्पन्न कमी यामुळे एसटीस कठीण काळातून जावे लागले. आता सर्व सुरळीत होत असून, कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी एसटीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यात एक लाखाहून अधिक कर्मचारी असून, आपल्या एसटीची जबाबदारी आता आपणच स्विकारली पाहिजे. तसेच एसटी वाहतूक पुर्वपदावर आणत या दिवाळीतच उत्पन्न वाढवून दाखवा, असे आवाहनही त्यांनी केले.