अध्याय चौदावा
सर्व साधक हे आत्मसुखाचे चाहते असतात. त्यासाठी ते नाना प्रकारचे प्रयत्न करतात पण हे प्रयत्न करत असताना मी प्रयत्न करतोय हा विचार प्रभावी असतो. जोपर्यंत मीपणाची भावना प्रबळ असते तोपर्यंत ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव गौण ठरते. मीपणा विसरून कोणतंही साधन केलं तर ते ईश्वराचं भजन होतं आणि साधकाला आत्मसुखाची प्राप्ती करून देतं. जे निरपेक्षतेनं भजन करून आवडीने भक्तीची लागवड करतात, तेच आत्मसुख मिळवण्यात यशस्वी होतात.
भगवंत आत्मसुखाबद्दल विशेष माहिती देताना सांगतात, माझ्या आत्मसुखामध्ये शिळेपणाची गोष्टच नाही. कल्पांतीसुद्धा त्याचा वीट यावयाचा नाही. इतर सुखांचा उपभोग घ्यायला हातपाय डोळे इत्यादी अवयव धडधाकट असावे लागतात. हे अवयव जर विकलांग झाले तर समोर सुख हात जोडून उभं असलं तरी मनुष्य त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. पण आत्मसुखाची गोष्टच वेगळी आहे, त्याची अनुभूती घेण्यासाठी इंद्रियांची गरजच नाही. असे हे पवित्र भक्तीसुख कोणाच्याही आधीन नसते आणि भाग्यवंतानाच त्याची प्राप्ती होते. भौतिक सुखाचा आनंद घेण्यासाठी देहाची गरज असते पण आत्मसुखाची अनुभूती घेताना देही मनुष्य विदेही होत असतो. आत्मसुखाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हे सुख एकदा मिळू लागले की, ते कधीही लयास जात नाही आणि शेवटी ब्रह्मनिर्वाण मिळवून देते. अशा प्रकारे उत्तम भक्त सुखी झाले, तर त्यांत नवल कसले ! पण मुळातच माझं भजन ही एव्हढी मोठी शक्ती आहे की, विषयात रमणाऱया लोकांनासुद्धा माझ्या भजनाने सुखाची प्राप्ती होते. सुदैवाने जर सत्संगती प्राप्त झाली आणि आस्तिक्मयबुद्धी उत्पन्न होऊन माझ्या ठिकाणी अनन्यभाव उत्पन्न झाला आणि त्यायोगे माझी थोडीशी जरी भक्ती घडली तरीही विषयांची निवृत्ती होते. त्यांनी इंद्रियांवर विजय मिळवलेला नसतो. त्यामुळे विषयाच्या आकर्षणामुळे त्यांचे मन विषयांकडे ओढत असते पण दुसऱया बाजूने माझ्या ठिकाणी वाढणारी त्यांची भक्ती प्रभावी ठरते. त्यामुळे विषय त्यांच्यावर आक्रमण करू शकत नाहीत. त्यांचे माझ्या ठिकाणी एकनि÷ प्रेम असते. माझी भक्ती आवडीने केल्यामुळे विषयवासना जळून जातात. मग विषयांच्या ओढीने त्यांच्याबद्दल आवड उत्पन्न होईल अशी शक्मयता रहात नाही. आरसा स्वच्छ पुसला की, प्रतिमा स्पष्ट दिसू लागते, त्याप्रमाणे भक्तीच्या योगाने विषयांची धूळ बाजूला सारली जाते. माझी थोडीशी भक्ती त्यांना विषयांपासून दूर घेऊन जाते. भक्तीमुळे मनपरिवर्तन झाल्यावर विषयांच्या ओढीने त्यांची आसक्ती खवळण्याची शक्मयता मावळते. एव्हढेच नव्हे तर त्याच्याही पुढे जाऊन जो निखालस विषयासक्त असतो, प्रपंचयुक्त होऊन संसारांत अगदी गढलेला असतो, तोसुद्धा एखाद्या प्रसंगाने भक्त झाला, तर विरक्त होतो. त्याबद्दल सांगतो ऐक. काही कारणाने जिवाला भक्तीची गोडी वाटू लागते पण विषयाची इच्छा तर नष्ट झालेली नसते अशा परिस्थितीत जर त्याने विषयासक्ती गौण समजून माझ्या भक्तीचा आश्रय केला तर विषयासक्तीची विरक्ती होऊ शकते. ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रभावाने, पाण्याच्या संपर्कात आलेले मीठ, तत्काळ पाण्यात विरघळून जाते, त्याप्रमाणे भक्तीची भरपूर वाढ केली तर ती विषयाचे जाळे तोडून टाकते. अशा प्रकारे भजनाच्या अभ्यासाने विषयांची ताटातूट होते व आत्मसुखाचा लाभ होऊन आत्मानंदाची मिठी पडते. भक्ती वाढवून, विषयासक्तीचा प्रभाव कमी होऊ शकतो पण काही महाभागांच्या पूर्वीच्या पातकाचे सर्व मळ चित्ताला अत्यंत बळकट रीतीने जडून राहिलेले असतात, त्यामुळे त्यांचे चित्त अत्यंत चंचल होऊन विषयाने सदासर्वदा व्याकुळ होत असते. अशा लोकांच्या मनात माझी यत्किंचित् भक्तीही जर श्रद्धायुक्त रीतीने शिरली, तर ज्याप्रमाणे दिव्याच्या स्पर्शाने कापूर तत्काळ पूर्णपणे जळून नाहीसा होतो, त्याप्रमाणे माझी अल्पशी भक्ती त्यांच्या संचित आणि क्रियमाण पातकांच्या राशी पूर्णपणे जाळून खाक करते.
क्रमशः







