वृत्तसंस्था/ कोची
भारतीय हॉकी क्षेत्रातील ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक तसेच केरळच्या क्रीडा क्षेत्रात तब्बल चार दशकाच्या कालावधीत महत्त्वाची कामगिरी करणारे आर. श्रीधर शेणॉय यांचे रविवारी वयाच्या 72 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी धनलक्ष्मी आणि कन्या दिव्या असा परिवार आहे.
भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये शेणॉय ही व्यक्ती शिस्तबद्ध म्हणून ओळखली गेली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक हॉकीपटू तयार झाल्याची माहिती ऑलिंपियन दिनेश नाईक यांनी दिली. 1983 साली भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देशात क्रिकेट या क्रीडाप्रकाराकडे नवोदित खेळाडू आकर्षित झाले होते. पण त्यावेळी शेणॉय यांनी हॉकीचे आकर्षण नवोदित युवा खेळाडूमध्ये निर्माण केले. 1980 च्या दशकामध्ये शेणॉय यांनी सुमारे 35 शालेय संस्थामध्ये विद्यार्थ्यांना सायकलींगचे प्रशिक्षण दिले होते. आपल्या मार्गदर्शनाखाली शेणॉय यांनी भारतीय हॉकी क्षेत्रामध्ये अनेक हॉकी प्रशिक्षक निर्माण केले. केरळच्या क्रीडा संघटनांतर्फे शेणॉय यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









