वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी हॉकीपटू 65 वर्षीय अशोक दिवाण यांचे वास्तव्य सध्या अमेरिकेत असून ते लवकरच मायदेशी परतणार आहेत, अशी माहिती भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.
1976 च्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय हॉकी संघामध्ये गोलरक्षक म्हणून अशोक दिवाण यांचा समावेश होता तसेच विश्वचषक हॉकी स्पर्धा 1975 साली भारताने जिंकली होती. या संघात अशोक दिवाण यांची गोलरक्षकाची कामगिरी दर्जेदार झाली होती. गेल्या काही दिवसापासून दिवाण यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला हलविण्यात आले होते. आपल्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे दिवाण यांनी सांगितले असून आपण लवकरच भारतात परतणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना महामारी संकटामुळे विदेशी हवाई प्रवास बंद करण्यात आला आहे त्यांना आणखी काही दिवस अमेरिकेत रहावे लागेल. वैद्यकीय इलाजासाठी अशोक दिवाण यांना केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी प्रयत्न केले होते.









