बैलहोंगल येथे कोर्ट आवारातील घटना : पत्नी गंभीर जखमी
वार्ताहर /बाळेकुंद्री
निवृत्त सैनिकाने आपल्या पत्नीवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास बैलहोंगल शहरातील न्यायालयाच्या आवारात घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे.
बैलहोंगल तालुक्यातील ननगुंडीकोप्प गावचा माजी सैनिक शिवानंद अडकी (वय 36) असे पत्नीवर हल्ला केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जयमाला (वय 34) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव असून तिला तातडीने अधिक उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, पती शिवानंद अडकी याचा विवाह अकरा वर्षांपूर्वी धारवाड जिल्हय़ातील वरूर गावातील जयमालाशी झाला होता. दोघांच्यात गेल्या कांही वर्षांपासून कौटुंबिक तसेच आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता. त्यामुळे ती पतीला सोडून आपल्या वरूर या माहेरगावी वास्तव्यास होती. सदर कौटुंबिक वादामुळे न्यायालयात खटला सुरू होता. बुधवारी न्यायालयात खटल्यानंतर जयमाला आपल्या 8 वर्षांच्या मुलीसह बाहेर पडत असतानाच पती शिवानंद याने धावत येऊन पत्नी जयमालाच्या डोक्यावर, हातावर व पायावर कोयत्याने जोरदार हल्ला केला. त्यामुळे जयमाला जागेवरच रक्ताच्या थारोळय़ात पडली. या हल्ल्यामुळे जयमालाची प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने बेळगावच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. संशयित आरोपी शिवानंद अडकी स्वतःहून पोलीस स्थानकात हजर झाला. बैलहोंगल पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









