कर्नल कुलदीप कुमार यांचे आश्वासन
वार्ताहर / सावंतवाडी:
जिल्हय़ातील माजी सैनिकांसाठी लवकरच सावंतवाडी येथे टी. ए. बटालियनचे एक्स्टेंशन काऊंटर कॅन्टीन पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन टी. ए. बटालियन, कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कुलदीप कुमार यांनी इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग, सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या शिष्टमंडळाला दिले.
लिगचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पी. एफ. डॉन्टस यांनी सावंतवाडीत माजी सैनिकांसाठी पूर्ववत कॅन्टीन सुरू होण्यासाठी कर्नल कुलदीप कुमार व ऍडम कमांडंट कर्नल नागेश यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. यावेळी कॅप्टन दीनानाथ सावंत, चंद्रकांत शिरसाट, सुभेदार सुभाष सावंत, बाबुराव कविटकर, सुनील राऊळ उपस्थित होते. जिल्हय़ातील माजी सैनिकांसाठी यापूर्वी सावंतवाडी येथे मिलिट्री कॅन्टीन सुरू होते. मात्र, दीड वर्ष ते बंद आहे. त्यामुळे माजी सैनिकांना कॅन्टीन सुविधेसाठी गोवा, कोल्हापूर किंवा बेळगावला जावे लागते. वयस्कर माजी सैनिकांची त्यामुळे परवड होते. याबाबतची वस्तुस्थिती पी. एफ. डॉन्टस यांनी कर्नल कुलदीप कुमार यांना सांगितली. त्याचप्रमाणे जिल्हय़ातील एकूण माजी सैनिकांपैकी 85 टक्के माजी सैनिक सावंतवाडी तालुक्यात असल्यामुळे सावंतवाडी येथेच कॅन्टीन सुविधा पूर्ववत सुरू होणे गरजेचे असल्याचे पटवून दिले. याबाबत कर्नल कुलदीप कुमार यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून लवकरच टी. ए. बटालियनचे बंद केलेले एक्स्टेंशन काऊंटर कॅन्टीन सावंतवाडीत सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लवकरच आपण सावंतवाडीत भेट देऊन माजी सैनिकांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









