प्रतिनिधी / येळ्ळूर
येळ्ळूर येथील सरकारी आदर्श मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या 1993 साली 7 वी पास माजी विद्यार्थ्यांनी शाळेत स्वतंत्र व सुसज्ज असे वाचनालय निर्माण करून दिले. नूतन वाचनालयाचे उद्घाटन माजी विद्यार्थ्यांच्या व त्यावेळी कार्यरत शिक्षकांच्या उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष रामदास धुळजी होते.
प्रभारी मुख्याध्यापिका एस. आर. निलजकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी शिक्षिकांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांचे स्मृतिचिन्ह व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी एम. एस. मंडोळकर यांनी माजी शिक्षकांचा तर माजी विद्यार्थ्यांचा परिचय के. डी. पाटील यांनी करून दिला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या प्रगतीबद्दल प्रशंसा केली. यावेळी माजी विद्यार्थी व माजी शिक्षकांनी विचार व्यक्त केले. शाळेच्या सहशिक्षिका एस. बी. दुरगुडे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ कमिटीचे अध्यक्ष डी. सी. बागेवाडी उपस्थित होते. त्यांनीच आढावा घेतला. रामदास धुळजी यांनी शाळेवर आधारित कविता सादर करून विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन ए. वाय. मेणसे यांनी केले. एम. वाय. कडोलकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. यावेळी आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, एसडीएमसी सदस्य उपस्थित होते.









