डॉ. प्रमोद सावंत यांना टार्गेट करणे चुकीचे : भ्रष्टाचारात ‘काहीजण’ हे नेमके कोण ?
प्रतिनिधी /पणजी
गोव्याचे माजी राज्यपाल व सध्या मेघालयाच्या राज्यपालपदाचा कारभार सांभाळीत असलेले राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भ्रष्टाचारी आहेत असे कुठेही म्हटलेले नाही. आपल्या निवेदनामुळे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करून त्यांचा राजीनामा मागणे ही चूक आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचारात अन्य काहीजण सहभागी आहेत व आपण त्यांची नावे घेण्यास इच्छूक नाही, असे ते म्हणाले. राज्यपालांच्या या निवेदनाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सोमवारी एक राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फार मोठा धमाका उडवून दिला. त्यांनी आपल्या निवेदनात गोव्यातील सरकार भ्रष्टाचारी असल्याचे म्हटले होते. मात्र त्यांनी कुठेही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला नव्हता. राज्यपालांच्या त्या निवेदनाने मात्र गोव्यातील सर्व विरोधी पक्ष जागृत झाले, आक्रमक बनले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजिनाम्याची मंगळवारी जोरदार मागणी केली.
काँग्रेस, आप या दोन्ही पक्षांनी आझाद मैदानावर सरकार विरोधात जोरदार आंदोलन केले तर गोवा फॉरवर्डने राज्यपालांना भेटून डॉ. प्रमोद सावंत सरकार ताबडतोब बडतर्फ करून राष्ट्रपती राजवटीची लेखी मागणी केली. मगो पक्षाने मुख्यमंत्र्यांना नैतिकतेच्या पातळीवर राजीनामा देऊन राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली.
सरकारला बदनाम करण्याचा ठेका घेतलेला नाही
या साऱया प्रकारामुळे दिवसभर जोरदार दबावाखाली असलेल्या भाजपला बुधवारी तेव्हा दिलासा मिळाला जेव्हा गोव्यातील एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज्यपालांनी स्पष्ट खुलासा केला व त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर आपण कोणतेही आरोप केलेले नाहीत. त्यांना आपण भ्रष्टाचारी म्हटलेले नाही. आपल्या निवेदनाचे गोव्यात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात तीव्र पडसाद उमटतील याची आपल्याला कल्पना नव्हती. आपल्या निवेदनाने डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजिनाम्याची मागणी करण्याची गरज नाही. त्याचबरोबर गोवा सरकारला काही बदनाम करण्याचा ठेका आपण घेतलेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
त्यांनी आणखी एक निवेदन केले त्यात त्यांनी मुख्यमंत्री भ्रष्टाचारात सामिल नाही, परंतु कोरोना काळात अन्य काहीजण सहभागी झालेले आहेत. आपल्याला त्यांची नावे विचारू नका. आपल्याला याउपर काही बोलायचे नाही, असे ते म्हणाले.
सरकार पूर्णत भ्रष्टाचारातून बाहेर पडलेले नाही राज्यपालांच्या या ताज्या निवेदनामुळे मुख्यमंत्र्यांवरचे बालंट निघाले खरे. परंतु ‘इतर काहीजण’ याचा अर्थ काय ? म्हणजे सरकार पूर्णतः भ्रष्टाचारातून बाहेर पडलेले नाही हे स्पष्ट होते. मुख्यमंत्र्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी भाजपला फार मोठा दिलासा मिळाला असे म्हणता येणार नाही.
माजी राज्यपालांनी राजकीय आखाडय़ात उतरावे : भाजप प्रदेशाध्यक्षांचे आव्हान,मलिक यांच्या आरोपांचे खंडन

गोव्याचे माजी राज्यपाल आणि आताचे मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोपांचे भाजपने खंडन केले असून ते फेटाळून लावले आहेत. हे राजकीय षडयंत्र असल्याचा प्रतिआरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केला असून माजी राज्यपालांनी राजीनामा देवून राजकीय आखाडय़ात उतरावे, असेही म्हटले आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे यांनी सांगितले की, राजदीप सरदेसाई यांनी षडयंत्र करुन त्यांना हवे ते राज्यपालांकडून वदवून घेतले. राज्यपालपदाला एक प्रकारचा घटनात्मक दर्जा आहे आणि त्या घटनेच्या चौकटीत राहून त्यांनी काम करायला हवे परंतु या राज्यपालांनी तो दर्जा खालावून टाकला. सरदेसाई यांनी आपल्या मनातील उत्तरे मलिक यांच्या वाणीत उतरवली हे एक प्रकारचे षडयंत्र असून त्यास गोमंतकीय जनता बळी पडणार नाही, अशी खात्री तानावडे यांनी प्रकट केली.
कोविड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाल्याचा केला होता दावा
गोव्यात असताना राज्यपालांनी राज्यात कोविड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाल्याचा दावा केला होता याची आठवण करुन तानावडे म्हणाले की, कोविड लॉकडाऊन काळात गोव्यातील दुकाने बंद होती व अत्यावश्यक वस्तू साहित्य वाटपासाठी खासगी कंपनीला कंत्राट दिले होते हा राज्यपालांचा आरोप चुकीचा असल्याचा खुलासा तानावडे यांनी केला. लॉकडाऊन काळात गोव्यातील सर्व अत्यावश्यक सामानाची दुकाने जनतेला खरेदीसाठी खुली ठेवण्यात आली होती आणि खासगी कंपनीस कंत्राट दिले नव्हते, असेही तानावडे यांनी नमूद केले. केंद्र व राज्य सरकारने एसओपी पाळून कोविड व्यवस्थापन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.
राजभवनची जुनी इमारत पाडण्याचा प्रस्ताव नव्हता राजभवनची जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव असल्याचा आरोपही माजी राज्यपालांनी केला होता. त्यातही तथ्य नाही असे सांगून तानावडे म्हणाले की जुनी इमारत पाडण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता तर नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. राजभवनची जुनी इमारत ऐतिहासिक असून ती कायमच ठेवण्याचा प्रस्ताव होता. त्यात लिप्ट नाही आणि जीने चढायला त्रास होतो म्हणून राज्यपालांची तक्रार होती म्हणून नवीनच इमारतीचा प्रस्ताव होता, असा दावा तानावडे यांनी केला. या आरोपांचा व राजकीय षडयंत्राचा भाजपावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री त्यांनी प्रकट केली. तृणमूल काँग्रेस पं. बंगालमध्ये भ्रमाचे राजकारण करीत पंतप्रधान, गृहमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री यांना ममतांच्या पायाखाली चिरडण्याचे कार्टून प्रसारीत करणे ही त्याचीच एक झलक आहे. त्याला प्रतिउत्तर म्हणून ममतांच्या पोस्टरवर काळे फासण्याचे काम कोणीही स्वाभिमानी गोमंतकीय करु शकतात ते काम भाजप कार्यकर्त्यांनीच करायला पाहिजे, असे काही नाही. तृणमूल काँग्रेसची ती कृती निषेधार्ह असल्याचे तानावडे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेला दामू नाईक तसेच नगरविकास मंत्री मिलिंद नाईक उपस्थित होते.









