प्रतिनिधी / कराड
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण सैदापूर (ता. कराड) येथे सोमवारी दुपारी लग्न सोहळ्याला गेले होते. सोहळ्यावरून परततानाच त्यांना सैदापूर कॅनॉलवर गर्दी दिसली. त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवत स्वतः गर्दीत जाऊन चौकशी केली. एका वृद्धेला रिक्षाने धडक दिल्याने ती जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेतील वृद्धेला तातडीने आपल्या वाहनांच्या ताफ्यातील गाडीतून त्यांनी रूग्णालयात पाठवले.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेचा विषय ठरली. सोमवारी दुपारी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे सैदापूर येथील कार्यकर्त्याच्या कुटूंबातील लग्नसोहळ्याला गेले होते. लग्न सोहळ्याला उपस्थित राहून कराडला परतत असताना सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना गर्दी दिसली. त्यांनी गाडी थांबवण्याच्या सुचना दिल्या. ते गाडीतून उतरले. गर्दीत जाऊन पाहिल्यावर अपघात झाल्याचे समजले. एका वृद्धेला रिक्षाने धडक दिली होती. पृथ्वीराजबाबांनी जखमी वृद्धोची चौकशी करून तिला तातडीने रूग्णालयात येण्याची विनंती केली. त्यांच्यासमवेत असलेल्या नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या कारमधून वृद्धेला उपचारासाठी गुजर हॉस्पीटल येथे आणण्यात आले. पृथ्वीराजबाबांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेची परिसरात व सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहे.









