बेंगळूर/प्रतिनिधी
बसवराज बोम्माई यांनी बुधवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यांनतर आता प्रतीक्षा आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. यासाठी अनेक नेत्यांनी बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी जोर लावत आहेत. पण राज्याचे माजी उद्योग व वाणिज्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी मंत्रिमंडळात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान याविषयी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी स्वत: ला बोम्माई मंत्रिमंडळातून वगळले आहे. “मी मंत्रिमंडळात न येण्याचा निर्णय घेतला आहे. इतरांना संधी द्या, ” असे शेट्टर म्हणाले. “येडियुरप्पा माझ्यापेक्षा वरिष्ठ असल्याने त्यांच्या मंत्रिमंडळात मला काम करायला काहीच हरकत नव्हती… पण आता परिस्थिती थोडी वेगळी आहे आणि मी पक्षासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
तथापि, बोम्माई यांनी माझ्या मंत्रिमंडळात काम केले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात काम करणे मला बरे वाटणार नाही. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे, ” असे शेट्टर यांनी बेंगळूरमध्ये सांगितले.” मागील येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शेट्टर उद्योग व वाणिज्यमंत्री होते. तसेच त्यांनी याआधी राज्याचे मुख्यमंत्री म्ह्णून काम केले आहे.









