माजी मिस युक्रेन वेरोनिका डिडुसेन्को हिला देखील स्वतःचा देश सोडावा लागला आहे. वेरोनिका सध्या अमेरिकेत असून एका पत्रकार परिषदेत तिने स्वतःचे दुःख व्यक्त करत अन्य देशांना मदतीचे आवाहन केले आहे.
2018 मध्ये मिस युक्रेन ठरलेली वेरोनिका आणि तिचा 7 वर्षांचा मुलगा हल्ल्याच्या एक दिवसापूर्वी एअर रेड सायरन आणि स्फोटांच्या आवाजांनी जागे झाले होते. त्यानंतर त्यांनी त्वरित घर सोडून हजारो लोकांसोबत पायीच सीमेच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. सायरन, रॉकेट किंवा बॉम्बवर्षावाचा आवाज ऐकू येत नसलेले कुठलेच ठिकाण नव्हते असे तिने म्हटले आहे.

कीव्हमधून बाहेर पडल्यावर वेरोनिका स्वतःच्या मुलासोबत मोल्डोवापर्यंत पोहोचली. तेथून स्वीत्झर्लंडमधील जिनिव्हा येथे पोहोचल्यावर मुलाला तिथेच सोडून वेरोनिका वीमेन्स राइट्स ऍटर्नीसोबत पत्रकार परिषदेसाठी अमेरिकेत दाखल झाली. मुलाला जिनिव्हात सोडून पत्रकार परिषदेसाठी अमेरिकेत येण्याचा त्रासदायक निर्णय घेतला, कारण जगासमोर माझ्या मातृभूमीची सद्यस्थिती सांगणे आवश्यक वाटले असे तिने म्हटले आहे.
सध्या हजारो मुले आणि त्यांच्या माता भूमिगत स्थानके आणि बॉम्ब शेल्टर्समध्ये राहत आहेत. याहून अधिक वाईट बॉम्ब शेल्टर्समध्ये अपत्याला जन्म देणाऱया महिलांना पाहून वाटते. युक्रेनचा प्रत्येक व्यक्ती देशाच्या रक्षणासाठी दृढनिश्चयी असून आम्हाला अन्य देशांची मदत हवी आहे. युक्रेनच्या लोकांकडे स्वतःच्या देशाला वाचविण्याची हिंमत आहे. परंतु सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी आम्हाला शस्त्रास्त्रs हवी आहेत असे तिने सांगितले आहे.









