थिएटर, काजू उद्योजक म्हणून प्रसिद्ध , आज डिचोलीत अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ पणजी
माजी मंत्री, माजी खासदार हरिष झांटय़े उर्फ ‘अण्णा’ यांचे दीर्घ आजाराने शनिवारी सकाळी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी सकाळी त्यांच्या जन्मगावी डिचोलीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. राज्यातील चित्रपटगृहांचा व्यवसाय चालविणारे, काजू व्यवसाय चालविणारे उद्योजक तसेच डिचोली अर्बन बँकेचे संस्थापकीय संचालक असलेल्या अण्णा झांटय़े यांच्या निधनाने गोवा एका चांगल्या नेत्याला मुकला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
हरिष उर्फ अण्णा झांटय़े यांनी 1979 मध्ये डिचोली मतादरसंघातून ‘अपक्ष’ म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर त्यांनी प्रतापसिंह राणे मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री तथा समाजकल्याणमंत्री म्हणूनही काम केले. 1984 निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या अण्णांचा डिचोलीत पुन्हा विजय झाला आणि ते प्रतापसिंह राणे मंत्रिमंडळात वीजमंत्री बनले. त्यांच्याकडे नदी परिवहन व प्रोव्हेदोरियाचीही खाती होती. 1987 मध्ये त्यांचे वीज खाते राणे यांनी काढून घेतले. 1989 च्या निवडणुकीत त्यांना मगो नेते पांडुरंग राऊत यांच्याकडून पराभव सहन करावा लागला. परंतु 1991 च्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर गोव्यातून काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले. नवी दिल्लीत राष्ट्रीय राजकारणात त्यांचे जास्त लक्ष लागले नाही. त्यांना स्थानिक राजकारणाचीच ओढ लागली होती.
1996 च्या लोकसभा निवडणुकीत ते अपयशी ठरले आणि 2002च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मये मतदारसंघातून काँग्रेसतर्फे विजय मिळविला होता.
सेवाभावी कार्य!
अण्णा झांटय़े हे राजकारणात उतरण्यापूर्वीपासून गोव्यात थिएटर चालवित असतं. पणजीतील सम्राट अशोक थिएटरांबरोबरच गोव्यात विविध गावात त्यांनी चित्रपटगृहे उभारुन प्रेक्षकांची सिनेमाची व्यवस्था त्यांनी केली. विविध सामाजिक संघटनांसाठी त्यांनी आपले फार मोठे आर्थिक योगदान दिले होते. डिचोली येथे धी डिचोली अर्बन सहकारी बँकेची स्थापना करुन त्याचा गोव्यातील अनेक भागात शाखाही उघडल्या. डिचोली येथे झांटय़े कॉलेजची स्थापना करुन त्याद्वारे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची द्वारे खुली करुन दिली. झांटय़े परिवारातर्फे पूर्वीपासून काजू व्यवसाय चालू आहे. केवळ देशातच नव्हे तर अनेक राष्ट्रांमध्ये गोव्याचा झांटय़े काजू हा प्रसिद्ध आहे.
अण्णांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव तथा मयेचे आमदार प्रविण झांटय़े तसेच कन्या, सुन, जावई, नातवंडे आणि अण्णांचे भाऊ असा परिवार आहे.
झांटय़े यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी कांपाल पणजी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले. अण्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज सकाळी 11 वा. डिचोली येथील स्मशानभूमीत करण्यात येतील. तत्पूर्वी अण्णांच्या मूळ घरी डिचोली येथे त्यांचे पार्थिव जनतेला दर्शनासाठी ठेवले जाईल. अण्णांच्या निधनाचे वृत्त समजताच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी कांपाल येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंतिम दर्शन घेतले आणि पुष्पचक्र वाहिले व प्रविण झांटय़े यांचे त्यांनी सांत्वन केले.
चांगला नेता हरपला ः मुख्यमंत्री
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरिष झांटय़े यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या दुखवटा संदेशात त्यांनी म्हटले आहे की, अण्णांचे गोव्याच्या विकासात मोठे योगदान आहे. सुस्वभावी नेता अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने गोवा एका चांगल्या नेत्याला मुकला आहे.