राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती
प्रतिनिधी/बेंगळूर
आयएमए ज्वेलर्स आणि समुहाने गुंतवणूकदारांची केलेल्या फसवणूक प्रकरणी 36 वे आरोपी असणारे माजी मंत्री रोशन बेग यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.सदर मालमत्तेची विक्री करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात येणार आहेत.
आयएमए फसवणूक प्रकरणी रोशन बेग यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली असून बँक खाती गोठविण्यात आली आहेत. मात्र, किती मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले आहे.
आयएमए ज्वेलर्स आणि समुहाने अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून हजारो जणांकडून कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. मात्र, पैसे परत न देता त्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी आएमए समुहाचा मालक मन्सूर अली खान यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. मन्सूरला सहकार्य केल्याच्या आरोपावरून माजी मंत्री रोशन बेग यांना 22 नोव्हेंबर 2020 रोजी सीबीआयने अटक केली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी राज्य सरकारने आयएमएच्या मालमत्तांची विक्री केली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी असणाऱयांच्याही मालमत्ता जप्त करून गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.









