प्रतिनिधी / बेंगळूर
माजी मंत्री आणि निवृत्त प्राध्यापक मुमताज अली खान (वय 94) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. बेंगळूरच्या गंगानगर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2008 मध्ये मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अल्पसंख्याक कल्याण-वक्फ, हज खात्याची जबाबदारी सांभाळली होती. बेंगळूर कृषी विद्यापीठात समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काही वर्षे सेवा बजावली होती. बेंगळूरच्या आर. टी. नगर येथे ते तीन दशकांपासून शाळा चालवत असून तेथे मुलांना मोफत शिक्षण, पाठय़पुस्तके, गणवेश आणि दुपारचे भोजन देत होते. त्यांच्या निधनाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.









