प्रतिनिधी/ मडगाव
माजी मंत्री रमेश तवडकर यांनी हल्लीज काजूचा दर कोसळल्याने, त्या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदर्श कृषी सहकारी संस्थेच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यातून या संस्थेच्या नावाची बदनामी झाल्याचा दावा या संस्थेच्या संचालकांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून करताना, तवडकर यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे.
रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेतून गोवा कृषी पणन मंडळ, गोवा बागायतदार व आदर्श कृषी संस्थेच्या नावाचा उल्लेख करून काजूचा दर कोणी निश्चित करावा हे स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले होते. त्याच बरोबर गोव्यात काजू माफिया आहेत का असा सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे आदर्श कृषी संस्थेचे सभासद नाराज झाले असून त्यांनी श्री. तवडकर यांनी प्रसार माध्यमांकडे जाण्यापूर्वी आदर्शचे चेअरमन जे गोवा कृषी पणन मंडळाचे चेअरमन आहेत. त्याची भेट घेऊन काजू दराविषयी चर्चा करायला पाहिजे होते असे मत काल पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आदर्श कृषी संस्था ही बेंदुर्डे गावात सुरू केली होती व काजू खरेदीवर भर दिला होता. ही संस्था सेंद्रीय काजू खरेदी करून ती मंगलोर येथील आचल कारखान्याला काजू पुरवठा करते. त्यामुळे काणकोण, केपे, सांगे व धारबांदोडा भागातील काजू शेतकऱयांना मोठा दिलासा मिळत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. सेंद्रीय काजूवर दर फरक दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली व त्यावर शेतकरी खुष आहे. या पार्श्वभूमीवर जर कोणी संस्थेची नाहक बदनामी करत असल्यास त्याची गय केली जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.
या पत्रकार परिषदेला आदर्श कृषी संस्थेचे सभासद गोविंद वेळीप, नागेश वेळीप इत्यादी उपस्थित होते.









