श्रीनगर / वृत्तसंस्था
जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या चार दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्हय़ातून पोलिसांनी अटक केली आहे. या चार दहशतवाद्यांमध्ये पूर्वी पोलीस सेवेत असलेल्या एका संशयिताचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी तो पळून गेला होता.
बडगाम जिल्हय़ातील हायतापौरा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर या भागात पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यातील एक जण अल्ताफ हुसेन हा पोलीस अधिकारी होता. याव्यतिरिक्त अहमद भाट, जमशीद माग्रे, झाहीद दार अशी त्या दहशतवाद्यांची नावे आहेत. सर्वांची अधिक चौकशी केली जात आहे. मागील आठवडय़ापासून जम्मूöकाश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढलेल्या दिसून येत आहेत. दहशतवाद्यांवर कारवाई करताना चकमकीही होत असल्याने सध्या राज्याच्या विविध भागात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.









