तेलंगणात सुरभि देवी वाणींचा विजय्र
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाच्या विधान परिषदेच्या दोन जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही जागांवर तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) विजय मिळविला आहे. यातील एका जागेवर माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कन्या सुरभि वाणी देवी विजयी झाल्या आहेत. हैदराबादच्या रंगारेड्डी महबूबनगर मतदारसंघाच्या त्या उमेदवार होत्या. त्यांनी भाजप उमेदवार रामचंद्र राव यांना पराभूत केले आहे. तर दुसऱया जागेवर टीआरएस नेते पल्ला राजेश्वर रेड्डी यांनी विजय मिळविला आहे.
दोन्ही जागांवर मोठय़ा संख्येत उमेदवार असल्याने निकाल जाहीर करण्यास विलंब झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतपत्रिकांचा आकार मोठा होता. हैदराबाद-रंगारेड्डी-महबूबनगर मतदारसंघात 91 तर खम्माम-नलगोंडा आणि वारंगल भागातून 60 उमेदवार मैदानात होते. 14 मार्च रोजी या दोन्ही जागांकरता मतदान झाले होते. तीन दिवस चाललेल्या मतमोजणीनंतर अधिकाऱयांनी शनिवारी रात्री उशिरा निकाल जाहीर केला आहे.
सुरभि वाणी देवी यांचा जन्म 1 एप्रिल 1952 रोजी करीमनगर जिल्हय़ातील वंगारामध्ये झाला होता. कलाकार, शिक्षिका आणि समाजसेविका म्हणून त्यांना ओळखले जाते. सध्या त्या हैदराबादच्या ज्युबिली हिल्स येथे राहतात.









