महिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणीचा आरोप : तामिळनाडूत कारवाई
वृत्तसंस्था / चेन्नई
कलकता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी.एस. कर्णन यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. तामिळनाडू बार कौन्सिलकडून मागील महिन्यात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत न्यायाधीश कर्णन यांच्या विरोधात न्यायाधीशांच्या पत्नी, महिला वकील आणि न्यायालयाच्या महिला कर्मचाऱयांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप नमूद होता. महिलांना बलात्काराची धमकी देत लैंगिक टिप्पणी केल्याचाही आरोप त्यांच्यावर होता.
27 ऑक्टोबर रोजी चेन्नई पोलिसांच्या सायबर शाखेत मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलाने तक्रार नेंदविली होती. या तक्रारीनंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिले होते. या पत्रात कर्णन हे महिलांसंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी करत असल्याचे दाखविणाऱया चित्रफितीचा उल्लेख करण्यात आला होता. न्यायालयीन अधिकारी तसेच न्यायाधीशांच्या पत्नींना लैंगिक हिंसाचाराची धमकी देताना कर्णन यात दिसून येतात. चित्रफितीत त्यांनी संबंधित महिलांची नावेही उच्चारली आहेत.
कर्णन यांच्या कथित चित्रफिती प्रसारित झाल्या आहेत. याचिकेत या चित्रफितीला पुरावा म्हणून मानण्याची मागणी करण्यात आली होती.









