ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे शिवसैनिकांकडून मारहाण झालेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 वाजता ते राजभवनावर जाणार आहेत. त्यामुळे आता या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मदन शर्मा हे निवृत्त सैनिक असल्यामुळे त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरही चांगलाच गाजला होता.भाजपसह अनेकांनी याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी, ही मागणी लावून धरली होती. तर, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेेत माजी सैनिकाला अशाप्रकारे मारहाण होणे, खेदजनक असल्याचे म्हटले होते. तसेच भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, मदन शर्मा यांना झालेली मारहाण आणि सध्या गाजत असलेले कंगना रानौत प्रकरणावरून विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे आता मदन शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








