प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील घरांचा कर वाढविल्यानंतर माजी नगरसेवक संघटनेने त्या विरोधात आवाज उठविला. त्याची दखल पालकमंत्री रमेश जारकीहोळी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार महांतेश कवटगीमठ यांनी घेतली आणि वाढवलेला स्थानिक कर महापालिकेला कमी करण्यास भाग पाडले. त्याबद्दल या सर्वांचा सत्कार माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने करण्यात आला.
महापालिकेमध्ये सभागृह अस्तित्वात नसताना बेकायदेशीररित्या अधिकाऱयांनी घरपट्टीच्या करामध्ये वाढ केली. राज्य सरकारने 15 टक्के वाढविले. त्यानंतर अधिकाऱयांनी त्यामध्ये पुन्हा स्थानिक कर वाढविला. त्या विरोधात माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांसह पालकमंत्र्यांना निवेदन देऊन कर कमी करावा, अशी मागणी केली. त्याची दखल पालकमंत्र्यांसह इतर नेत्यांनी घेतली. त्यामुळे त्यांचा सत्कार या संघटनेच्यावतीने करण्यात आला.
सरकारी विश्रामधाम येथे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि आमदार महांतेश कवटगीमठ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष नागेश सातेरी, जनरल सेपेटरी दीपक वाघेला, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मालोजी अष्टेकर, सरिता पाटील, शांता बुडवी, आप्पासाहेब पुजारी, माजी उपमहापौर कल्लाप्पा प्रधान, माजी नगरसेवक नेताजी जाधव, संजू प्रभू, निलिमा पावशे, वर्षा आजरेकर, माया कडोलकर, मोहन चिगरे यांच्यासह इतर माजी नगरसेवक उपस्थित होते..