ऑनलाईन टीम / मुंबई :
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील एक प्रसिद्ध समालोचक म्हणून भारतीय चाहते जोन्स यांना ओळखायचे. त्यांच्या अकाली निधनामुळे क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डीन जोन्स यांना गुरूवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की डीन जोन्स यांचे आज निधन झाले, अशी माहिती स्टार इंडियाने एका पत्रकाद्वारे दिली.
सध्या युएईमध्ये सुरू असलेल्यासलेल्या इंडियन प्रीमियर लीगसाठी कॉमेंटेटर म्हणून त्यांनी करार केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ते मुंबईमध्ये आले होते. दरम्यान, डीन जोन्स यांनी 52 कसोटी सामने खेळले असून 3,631 धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर 11 शतके असून 216 ही त्यांची सर्वाधिक धावसंख्या आहे.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर भारतीय कॅप्टन विराट कोहली, माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग, रवी शास्त्री आदींनी ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण केली आहे.